नशेसाठी पैसे न दिल्याने पत्नीवर गुप्तीने वार; पतीविरुद्ध गुन्हा दाखल

अमळनेर (प्रतिनिधी) नशा करण्यासाठी पैसे दिले नाहीत म्हणून पत्नीच्या पाठीत गुप्तीने वार केल्याची घटना तालुक्यातील धार येथे दि. १८ रोजी रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास घडली. याप्रकरणी पोलिसांत गुन्हा दाखव करण्यात आला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की, तालुक्यातील धार येथील तेजश्री राहुल भिल (वय २०) हिचे पती राहुल रोहिदास भिल (रा. धार) याच्याशी सतत वाद सुरू होते. राहुल हा पत्नीला “तू माझी पत्नी नाही” असे म्हणून वारंवार हिणवत असल्याने तेजश्री हिने न्यायालयात दावा दाखल केला होता. दि. १८ रोजी तेजश्री घरी असताना राहुल घरी आला व नशा करण्यासाठी पैसे मागू लागला. मात्र पत्नीने पैसे देण्यास नकार दिल्याने संतापलेल्या राहुलने तिच्या पाठीत गुप्तीने वार केला. त्यावेळी राहुलच्या काकांनी मध्यस्थी करत भांडण सोडविले व त्याला तेथून घेऊन गेले.

जखमी अवस्थेत तेजश्री हिने रात्र काढली. दि. २० रोजी ती आपल्या आईसोबत उपचारासाठी ग्रामीण रुग्णालयात गेली. तेथे तिच्या जखमेवर दोन टाके घालण्यात आले. त्यानंतर पोलिसांनी जबाब नोंदवून घेतला.

याप्रकरणी मारवड पोलीस ठाण्यात राहुल रोहिदास भिल याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम ११८(१), ११५ व ३५२ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सहाय्यक उपनिरीक्षक संजय पाटील करीत आहेत.

 

Author photo

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *