टाकरखेडा येथील चौघांच्या आत्महत्येप्रकरणी सीताराम भिलला ३१ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी

महिलेची बदनामी केल्याचा आरोप; व्यथित झालेल्या कुटुंबाने रेल्वेखाली घेतला टोकाचा निर्णय

 

अमळनेर (प्रतिनिधी ) तालुक्यातील टाकरखेडा येथे एकाच कुटुंबातील चौघांनी रेल्वेखाली आत्महत्या केल्याच्या धक्कादायक प्रकरणात पोलिसांनी सीताराम उर्फ गटलु ताणकु भिल याला अटक केली आहे. त्याला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने ३१ ऑगस्ट २०२६ पर्यंत पोलीस कोठडी सुनावली.

पोलिसांच्या प्राथमिक तपासानुसार, सीताराम भिल याने टाकरखेडा येथील सुनील अमृत भिल यांच्या पत्नीची बदनामी केल्याचा आरोप आहे. या प्रकारामुळे सुनील भिल मानसिकदृष्ट्या व्यथित झाले होते. त्यानंतर त्यांनी पत्नी व दोन मुलांसह रेल्वेखाली आत्महत्या केल्याचे पोलिस तपासात समोर आले आहे.

घटनेनंतर परिसरात मोठी खळबळ उडाली होती. या प्रकरणाचा तपास करताना पोलिसांनी सीताराम उर्फ गटलु ताणकु भिल याला ताब्यात घेतले. त्याला न्यायालयात हजर करण्यात आले. सुनावणीदरम्यान न्यायालयाने त्याला ३१ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी दिली आहे.

दरम्यान, या प्रकरणात नेमके कोणते कारण, कोणत्या प्रकारची बदनामी करण्यात आली आणि त्याचा आत्महत्येच्या घटनेशी नेमका संबंध काय, याबाबत पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे. पोलीस कोठडीदरम्यान या प्रकरणातील अधिक माहिती समोर येण्याची शक्यता आहे.

Author photo

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *