
आदिवासी समाजाच्या वज्रमुठीपुढे प्रशासन झुकले; उपोषणाची सांगता!
अमळनेर (प्रतिनिधी) : तालुक्यातील खडके येथील विनोद मोरे व त्यांच्या आदिवासी कुटुंबावर जातीवादी मानसिकतेतून हल्ला झाल्याचा आरोप करत आरोपींवर तातडीने कारवाई करावी, या मागणीसाठी पीडित कुटुंबीय व आदिवासी समाजबांधवांनी छेडलेल्या तीव्र उपोषणाची पोलिसांनी दिलेल्या ठोस आश्वासनानंतर सांगता करण्यात आली.
या प्रकरणी अॅट्रॉसिटी कायद्यान्वये गुन्हा दाखल होऊन दीड महिना उलटला, तरी संबंधित आरोपींना अटक झालेली नसल्याने पीडित कुटुंबासह आदिवासी समाजबांधवांमध्ये तीव्र नाराजी होती. आरोपींवर तातडीने कठोर कारवाई करावी, तपास निष्पक्षपणे करावा आणि पीडित कुटुंबाला संरक्षण द्यावे, या प्रमुख मागण्यांसाठी उपोषण सुरू करण्यात आले होते.
उपोषणाच्या पार्श्वभूमीवर पोलिस प्रशासनाने आंदोलकांशी चर्चा केली. पोलीस निरीक्षक निकम यांनी आरोपींवर कठोर कारवाई करण्याचे, प्रकरणाचा निष्पक्ष तपास करण्याचे तसेच पीडित विनोद मोरे यांच्या कुटुंबाला पूर्ण पोलीस संरक्षण देण्याचे ठोस आश्वासन दिले. पोलिसांकडून मिळालेल्या या आश्वासनानंतर आंदोलकांनी उपोषण मागे घेतले. या आंदोलनाच्या माध्यमातून आदिवासी समाजाने आपल्या न्याय्य मागण्यांसाठी एकजूट दाखवत प्रशासनाचे लक्ष वेधले. आरोपींवर कायदेशीर कारवाई होईपर्यंत या प्रकरणावर लक्ष ठेवण्याचा निर्धारही समाजबांधवांनी व्यक्त केला. या लढ्यात सामाजिक कार्यकर्ते प्रविण बैसाणे, ॲड. अविनाश खैरनार यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. तसेच बाबा बोरसे संस्थापक अध्यक्ष, आदिवासी क्रांती दल, आप्पा दाभाडे अध्यक्ष, उमाताई बोरसे, रमेश पवार मालेगाव, यांनी नेतृत्व व संघटन केले. यावेळी सुरेश भील, राजू नाईक, हरीचंद्र नाईक, संजय संदानशिव, सुदान वाघ कलाली, दयाराम मोरे, प्रकाश सोनवणे, अशोक मोरे, विजय भील जैतपूर, बाळू मालचे पारोळा, अमोल मालचे बापूजी ग्रुप, राजू भील कलाली तसेच किंगगाव येथील सर्व समाजबांधव उपस्थित होते. आरोपींवर कारवाई, निष्पक्ष तपास आणि पीडित कुटुंबाला संरक्षण देण्याचे आश्वासन मिळाल्याने उपोषणाची सांगता झाली असली, तरी पोलिसांच्या आश्वासनाची प्रत्यक्ष अंमलबजावणी होण्याकडे आता समाजबांधवांचे लक्ष लागले आहे.

Leave a Reply