
अमळनेरमध्ये रस्त्यावर बांधकाम साहित्याचे साचले ढीग; वाहतुकीचा उडतोय बोजवारा
नगर पालिका प्रशासन व शहर वाहतूक शाखेकडून दुर्लक्ष
अमळनेर (प्रतिनिधी) शहरातील जुन्या भागातील अरुंद गल्ली-बोळांमध्ये वाहतुकीची समस्या कायम असतानाच रस्त्यावरच वाळू, खडी, सिमेंट, लोखंडी सळई आदी बांधकाम साहित्य टाकण्याचा प्रकार वाढला आहे. पालिकेची कोणतीही पूर्वपरवानगी न घेता हे साहित्य थेट रस्त्यावरच टाकले जात असून ते अनेक दिवस तसेच पडून राहत असल्याने नागरिकांच्या अडचणीत भर पडत आहे. पालिकेकडूनही कोणतीही कारवाई केली जात नाही.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, अमळनेर शहरातील अधिक वर्दळीच्या गल्ल्यांमध्येही खबरदारी न घेता रस्त्याचा मोठा भाग व्यापला जात आहे. परिणामी पादचारी, दुचाकी व चारचाकी वाहनचालकांना मार्ग काढताना तारेवरची कसरत करावी लागत आहे. काही ठिकाणी रस्त्याचा अर्ध्याहून अधिक भाग साहित्याने अडविल्याने वाहतुकीचा अक्षरशः बोजवारा उडाल्याचे चित्र दिसत आहे. पालिका प्रशासन व शहर वाहतूक शाखेकडून ठोस कारवाई होत नसल्याने मालमत्ताधारक व बांधकाम व्यावसायिक बिनधास्तपणे रस्त्यावर साहित्य टाकत असल्याची नागरिकांची तक्रार आहे. परिणामी आपत्कालीन परिस्थितीत रुग्णवाहिका किंवा अग्निशमन दलाच्या वाहनांना अडथळा निर्माण होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. पालिकेतील बांधकाम विभागातील एका कर्मचाऱ्याने नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले की, रस्त्यावर साहित्य ठेवण्यासाठी आवश्यक परवानगी अनेकदा घेतली जात नाही.
नवीन वसाहतींमध्येही तोच प्रकार
मुंदडा नगर, पिंपळे रोड, ढेकू रोड, गलवाडे रोड तसेच आर. के. नगर मागील भागात सध्या मोठ्या प्रमाणात बांधकामे सुरू आहेत. या ठिकाणीही रस्त्यावर साहित्य ठेवण्यासाठी पालिकेकडून आवश्यक परवानगी घेतली जात नसल्याचे समोर आले आहे.
नियम आहेत; अंमलबजावणी मात्र ढिसाळ
नपा, मनपा अधिनियम व वाहतूक नियमांनुसार सार्वजनिक रस्त्यावर अडथळा निर्माण होईल असे साहित्य टाकण्यास मनाई आहे. आवश्यक असल्यास पालिकेची पूर्वपरवानगी घेणे बंधनकारक असून नियमभंग केल्यास दंडात्मक कारवाई व साहित्य जप्तीची तरतूद आहे. मात्र प्रत्यक्ष अंमलबजावणी अभावानेच होत असल्याने नियम केवळ कागदापुरतेच मर्यादित राहिल्याची टीका होत आहे.
बांधकाम परवानगी देतानाच संबंधित मालमत्ताधारकांना रस्त्यावर टाकलेल्या साहित्याची तातडीने विल्हेवाट लावण्याचे स्पष्ट निर्देश देणे गरजेचे असल्याची मागणी पुढे येत आहे. तसेच नियमभंग करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करून शिस्त लावावी, अशी अपेक्षा नागरिक व्यक्त करत आहेत.
पालिकेकडून कारवाईस दुर्लक्ष
“पिंपळे रोड परिसरातील नवीन वसाहतींमध्ये रस्त्याचा अर्धा भाग वाळू-खडीने व्यापलेला असतो. याबाबत तक्रार करूनही कोणी दखल घेत नाही. पालिकेची कारवाई फक्त कागदावरच दिसते. कारवाई होत नसल्याने बांधकाम साहित्य अनेक दिवस रस्त्यांवर पडून राहते.”
–हर्षल पाटील, नागरिक, पिंपळे रोड परिसर

Leave a Reply