वाढदिवसाचा खर्च टाळून शेतकऱ्यांना मदत; मुख्यमंत्री सहायता निधीसाठी ५१ हजारांचा धनादेश

अमळनेर (प्रतिनिधी) कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अशोक आधार पाटील यांनी वाढदिवसाचा थाटमाट टाळून सामाजिक बांधिलकी जपत मुख्यमंत्री सहायता निधीसाठी ५१ हजार रुपयांची मदत दिली. राज्यातील दुष्काळी परिस्थिती आणि शेतकऱ्यांच्या अडचणी लक्षात घेऊन बाजार समितीतर्फे हा धनादेश उपविभागीय अधिकारी मयूर भंगाळे यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला.

अमळनेर तालुक्यातील दुष्काळी परिस्थिती आणि शेतकऱ्यांच्या व्यथा लक्षात घेता सभापती अशोक आधार पाटील यांनी वाढदिवसानिमित्त पुष्पगुच्छ आणू नयेत, तसेच कार्यकर्त्यांनी लावलेले बॅनर काढून टाकावेत, अशा सूचना दिल्या होत्या. बाजार समितीत वाढदिवस साजरा करण्याचे नियोजन होते. मात्र, उत्सवावर खर्च करण्याऐवजी दुष्काळग्रस्तांना मदत व्हावी, या भावनेतून त्यांनी बाजार समितीच्या माध्यमातून मुख्यमंत्री सहायता निधीसाठी ५१ हजार रुपयांचा धनादेश देण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार उपविभागीय अधिकारी मयूर भंगाळे यांच्या कार्यालयात जाऊन सभापती अशोक आधार पाटील, संचालक समाधान धनगर, सचिव डॉ. उन्मेष राठोड, सहसचिव सुनील पाटील, योगेश महाजन, अशोक वाघ आणि रणजित शिंदे यांनी ५१ हजार रुपयांचा धनादेश मयूर भंगाळे यांच्याकडे सुपूर्द केला. दरम्यान, दुष्काळाचे चटके ग्रामीण भागातील तसेच गरीब कुटुंबांतील विद्यार्थ्यांना बसू नयेत, या उद्देशाने सभापती अशोक आधार पाटील यांनी मुलांना शैक्षणिक साहित्याचेही वाटप केले. वाढदिवसाचा अनावश्यक खर्च टाळून तो समाजोपयोगी कामासाठी वापरण्याच्या त्यांच्या निर्णयाचे कौतुक होत आहे.

 

Author photo

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *