नवीन वीजमीटरनंतर भरमसाठ बिले; चौकशीच्या मागणीसाठी शिवसेना युवासेना उपजिल्हाप्रमुखांचे उपोषण

अमळनेर (प्रतिनिधी) शहर व तालुक्यात महावितरणकडून नवीन वीजमीटर बसवल्यानंतर ग्राहकांना प्रत्यक्ष वापराच्या तुलनेत भरमसाठ आणि अवाजवी वीजबिले येत असल्याच्या तक्रारींची चौकशी करण्याच्या मागणीसाठी शिवसेना (युवासेना) उपजिल्हाप्रमुख प्रविण पुरुषोत्तम पाटील यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. या समस्येचे तातडीने निराकरण करण्यात यावे, या मागणीसाठी त्यांनी १७ सप्टेंबरपासून उपविभागीय अधिकारी कार्यालयाच्या आवारात शांततामय उपोषण सुरू केले आहे.

नवीन वीजमीटर बसवल्यानंतर प्रत्यक्ष वीजवापराच्या तुलनेत अतिशय जास्त रकमेची बिले ग्राहकांना येत असल्याचा आरोप निवेदनातून करण्यात आला आहे. यामध्ये एका चहा विक्रेत्याला तब्बल २१ हजार रुपयांचे वीजबिल आल्याचे नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे नवीन मीटर बसवल्यानंतरच्या मीटर रीडिंग आणि बिलिंग प्रक्रियेची सखोल तपासणी करण्याची मागणी प्रविण पुरुषोत्तम पाटील यांनी केली आहे. नागरिकांवर अनावश्यकपणे नवीन वीजमीटर बसवण्याची सक्ती करू नये, सौरऊर्जा प्रकल्प बसवलेल्या ग्राहकांनाही अवाजवी वीजबिले येत असल्याने त्यांच्या मीटर रीडिंग व बिलिंग प्रक्रियेची योग्य तपासणी करावी, तसेच सदोष वीजमीटरची तत्काळ तपासणी करून चुकीच्या पद्धतीने आकारलेली रक्कम समायोजित करावी, अशा मागण्या करण्यात आल्या आहेत. दरम्यान, प्रविण पुरुषोत्तम पाटील यांच्या उपोषणस्थळी महावितरणच्या अभियंत्यांनी भेट देऊन त्यांच्याशी चर्चा केली. समस्या सोडविण्याबाबत चर्चा करताना अभियंत्यांनी प्रविण पुरुषोत्तम पाटील यांना उपोषण मागे घेण्याची विनंती केली. मात्र, ग्राहकांना येणाऱ्या अवाजवी वीजबिलांच्या प्रश्नावर ठोस कार्यवाही होण्याची मागणी त्यांच्या वतीने करण्यात आली आहे.

यावेळी शिवसेनेचे जयेश चव्हाण, अजय पवार, प्रकाश पाटील, प्रदीप देशमुख तसेच वीज वितरण कंपनीचे अतिरिक्त कार्यकारी अभियंता ज्ञानेश्वर अंबडकर, सहायक अभियंता हेमंत सैदाने, सहायक लेखापाल योगेश बोरसे आणि सहायक अभियंता मोहन नेवाडे उपस्थित होते.

 

Author photo

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *