अंबरीष महाराज टेकडीवर आता पोलिसांची नजर; प्रेमी युगुलांसह ब्लॅकमेल करणाऱ्यांवरही कारवाईचा इशारा

अमळनेर (प्रतिनिधी) : अंबरीष महाराज टेकडी परिसरात वाढत असलेल्या गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी पोलिसांनी आता कडक पावले उचलली आहेत. टेकडीवर येणाऱ्या प्रेमी युगुलांवर तसेच त्यांच्या अश्लील छायाचित्रे व चित्रफिती काढून ब्लॅकमेल करणाऱ्या तरुणांवर लक्ष ठेवण्यासाठी पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम यांनी तीन महिला पोलिस कर्मचारी तसेच दामिनी पथकाला नियमित गस्त घालण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे टेकडी परिसरातील गैरप्रकारांवर पोलिसांची करडी नजर राहणार आहे.

अंबरीष महाराज टेकडीवर मोठ्या प्रमाणात वृक्षलागवड झाल्याने परिसराला ऑक्सिजन पार्कचे स्वरूप आले आहे. वाढलेल्या हिरवाईमुळे टेकडी परिसर निसर्गरम्य झाला असून सकाळी आणि सायंकाळी फिरण्यासाठी येणाऱ्या नागरिकांची संख्या वाढली आहे. पर्यटनस्थळ म्हणूनही अनेक नागरिक येथे भेट देत असतात. मात्र, या दाट जंगलाचा गैरफायदा घेत शहर व तालुक्यासह बाहेरगावातील काही प्रेमी युगुले दुपारच्या वेळी टेकडीवर येत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. दुसरीकडे, या युगुलांचे छायाचित्रे व चित्रफिती गुपचूप काढून त्यांना ब्लॅकमेल करण्याचे प्रकारही वाढल्याच्या तक्रारी पोलिस निरीक्षक दत्तात्रय निकम यांच्याकडे आल्या होत्या. तक्रारींची दखल घेत पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम यांनी अशा प्रकारे ब्लॅकमेल करणाऱ्या काही तरुणांना पकडून त्यांच्यावर कारवाई केली. तसेच टेकडीवर येणाऱ्या प्रेमी युगुलांवरही लक्ष ठेवण्याच्या सूचना पोलिसांना देण्यात आल्या आहेत.

 

महिला पोलिसांसह दामिनी पथकाची गस्त

 

टेकडी परिसरातील गैरप्रकार रोखण्यासाठी नम्रता जरे, मोनाली पाटील आणि श्यामल पारधी या महिला पोलिस कर्मचाऱ्यांसह दामिनी पथकातील कर्मचाऱ्यांना गस्त घालण्याचे आदेश देण्यात आले आहेत. टेकडी परिसरातील संवेदनशील ठिकाणी गस्त वाढवून गैरप्रकार करणाऱ्यांवर नियमानुसार कारवाई करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. दरम्यान, सार्वजनिक ठिकाणी दारूच्या नशेत गोंधळ घालून पोलिस उपनिरीक्षकांना धमकावण्याचा प्रयत्न करणाऱ्या एका व्यक्तीवरही पोलिसांनी कारवाई केली आहे.

 

दारूच्या नशेत पोलिस उपनिरीक्षकांना धमकावण्याचा प्रयत्न

 

राध्ये प्रेमराज महाजन (रा. माळीवाडा), हा पवन चौकात सार्वजनिक ठिकाणी दारूच्या नशेत गोंधळ घालत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्याला समजावण्यासाठी गेलेले पोलीस उपनिरीक्षक समाधान गायकवाड यांना त्याने धमकावण्याचा प्रयत्न केल्याची माहिती आहे. त्यानंतर पोलिसांनी त्याच्यावर कारवाई केली.याप्रकरणी मयुर पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीवरून भारतीय न्याय संहिता कलम २२४, महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम ८५ (१) तसेच महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम ११२, ११७ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास हेडकॉन्स्टेबल प्रमोद पाटील करीत आहेत .अंबरीष महाराज टेकडीसह शहरातील सार्वजनिक ठिकाणी गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी पोलिसांकडून गस्त आणि कारवाई वाढविण्यात येत असल्याने नागरिकांमध्ये समाधान व्यक्त होत आहे.

 

Author photo

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *