
शेअर्समध्ये नफ्याचे आमिष दाखवून अमळनेरचे डॉ. अनिल शिंदे यांना १.६५ कोटींचा घातला गंडा
अमळनेर (प्रतिनिधी ) सोशल मीडियावरून शेअर बाजार आणि क्रिप्टो करन्सीमध्ये गुंतवणुकीचे आमिष दाखवून अमळनेर येथील एका नामवंत सर्जन डॉक्टरची तब्बल १ कोटी ६५ लाख ५७ हजार २०४ रुपयांची फसवणूक झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. त्यांनी गतवर्षी विधानसभा निवडणूक लढवली होती. तसेच ते शहरातील नामवंत मेडिकल फाउंडेशनचे संस्थापक आहेत.
याबाबत अधिक माहिती अशी की, अमळनेर येथील डॉ. अनिल नथ्थू शिंदे (७० वर्ष) यांना २९ जानेवारी २०२६ रोजी सोशल मीडियावर ‘झांसी प्रवीण पाटील’ नावाच्या एका महिलेची फ्रेंड रिक्वेस्ट आली. मैत्री झाल्यानंतर तिने त्यांना ‘फॉरेक्स इंटरनॅशनल ट्रेडिंग’ आणि ‘सोलोनी’ नावाच्या मोबाईल ॲप्लिकेशनबद्दल माहिती दिली. सुरुवातीला विश्वास संपादन करण्यासाठी आरोपींनी डॉक्टरांकडून ७०,००० रुपये गुंतवून घेतले आणि त्यावर १,५३,०२१ रुपयांचा आभासी नफा दाखवला. हा नफा पाहून डॉक्टरांचा विश्वास बसला आणि त्यांनी पुढील २० दिवसांत मोठी रक्कम गुंतवली. एकूण १० टप्प्यांत सायबर भामट्यांनी सांगितल्याप्रमाणे वेगवेगळ्या बँक खात्यांत पैसे भरले. जेव्हा डॉक्टरांच्या ‘सोलोनी’ ॲपमधील खात्यात ३ कोटी ९१ लाखांहून अधिक नफा दिसू लागला, तेव्हा त्यांनी ती रक्कम काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, आरोपींनी ती रक्कम काढण्यासाठी ‘२० टक्के व्हेरिफिकेशन फी’ म्हणजेच ६५ लाख ३१ हजार रुपये भरण्याची अट घातली. इतके पैसे भरल्यानंतरही रक्कम मिळत नसल्याचे आणि आरोपी टाळाटाळ करत असल्याचे लक्षात आल्यावर आपली फसवणूक झाल्याची खात्री डॉक्टरांना पटली. यांनतर त्यांनी जळगाव सायबर पोलीस ठाण्यात धाव घेत गुन्हा दाखल केला.
८ दिवसांत भरले १.६५ कोटी
डॉक्टर शिंदे यांनी इंडसइंड बँक, बँक ऑफ महाराष्ट्र, येस बँक आणि ॲक्सिस बँक यांमधील विविध खात्यांवर पैसे वळवले. १ फेब्रुवारीला २ लाख रुपयांपासून गुंतवणुकीची सुरुवात झाली. त्यानंतर एकाच दिवशी ७ लाख, १५ लाख आणि १७ लाखांपर्यंतचे मोठे व्यवहार करण्यात आले. अवघ्या ८ दिवसांत डॉक्टरांनी १ कोटी ६५ लाख ५७ हजार २०४ रुपये भरले.

Leave a Reply