पातोंडा प्राथमिक आरोग्य केंद्र रात्री डॉक्टरांविना; आपत्कालीन रुग्णांचे हाल

अमळनेर (प्रतिनिधी) तालुक्यातील पातोंडा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात रात्रीच्या वेळी वैद्यकीय अधिकारी उपलब्ध नसल्याने आपत्कालीन रुग्णांचे मोठ्या प्रमाणावर हाल होत असल्याची गंभीर बाब समोर आली आहे. शासनाने कोट्यवधी रुपये खर्च करून सुसज्ज प्राथमिक आरोग्य केंद्र व निवासी इमारती उभारल्या असल्या, तरी रात्री डॉक्टर राहत नसल्याने या सुविधा निष्प्रभ ठरत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. त्यामुळे अपघातग्रस्त, सर्पदंश, श्वानदंश तसेच इतर गंभीर रुग्णांना रात्रीच्या वेळी उपचारासाठी अमळनेर किंवा अन्य रुग्णालयात जावे लागत असून, यामुळे रुग्णांच्या जीवाशी खेळ सुरू असल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, पातोंडा येथील जुनी प्राथमिक आरोग्य केंद्राची इमारत जीर्ण झाल्यानंतर शासनाने कोट्यवधी रुपये खर्च करून नवीन प्रशस्त इमारत तसेच वैद्यकीय अधिकाऱ्यांसाठी निवासी निवासस्थाने उभारली. या प्राथमिक आरोग्य केंद्राच्या कार्यक्षेत्रात चार उपकेंद्रे आणि तब्बल छत्तीस गावांचा समावेश आहे. त्यामुळे या भागातील हजारो नागरिकांच्या आरोग्य सेवेची जबाबदारी या केंद्रावर आहे.

सध्या या प्राथमिक आरोग्य केंद्रात दोन वैद्यकीय अधिकारी कार्यरत आहेत. मात्र, त्यापैकी एक जळगाव तर दुसरे अमळनेर येथून दररोज ये-जा करतात. सकाळी नऊ ते दहा वाजेच्या दरम्यान दवाखान्यात येणे आणि दुपारी अथवा संध्याकाळी परत जाणे, असा त्यांचा दिनक्रम असल्याचे ग्रामस्थ सांगतात. परिणामी रात्रीच्या वेळी प्राथमिक आरोग्य केंद्र डॉक्टरांविना राहत असल्याचा आरोप होत आहे. पातोंडा हे अमळनेर–चोपडा मुख्य मार्गावरील महत्त्वाचे गाव असल्याने या रस्त्यावर वारंवार अपघात घडतात. याशिवाय सर्पदंश, श्वानदंश, विषबाधा तसेच इतर आपत्कालीन स्वरूपाचे रुग्ण रात्रीच्या वेळी उपचारासाठी प्राथमिक आरोग्य केंद्रात येतात. मात्र, डॉक्टर उपलब्ध नसल्यामुळे त्यांना तातडीचे उपचार मिळत नाहीत. त्यामुळे अनेकदा रुग्णांना जीव मुठीत धरून अमळनेर किंवा इतर रुग्णालयात हलवावे लागते. ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार, रात्री ड्युटीवर असलेले वैद्यकीय कर्मचारी डॉक्टरांशिवाय काही महत्त्वाचे उपचार करू शकत नाहीत. विशेषतः सर्पदंशासारख्या गंभीर प्रकरणांमध्ये प्रतिबंधात्मक इंजेक्शन किंवा इतर उपचार डॉक्टरांच्या उपस्थितीतच करता येतात, असे कर्मचारी सांगतात. डॉक्टरांच्या मार्गदर्शनाशिवाय उपचार करून रुग्णाला काही बरे-वाईट झाल्यास त्याची जबाबदारी स्वीकारता येणार नाही, असे उत्तरही रुग्णांच्या नातेवाईकांना दिले जात असल्याची तक्रार आहे. शासनाने आधुनिक सुविधा, प्रशस्त इमारत आणि निवासी व्यवस्था उपलब्ध करून दिली असताना त्याचा अपेक्षित लाभ नागरिकांना मिळत नसल्याची खंत ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे. लाखो रुपयांची यंत्रसामग्री, औषधसाठा आणि इमारत असूनही रात्री डॉक्टर नसल्यामुळे या आरोग्य केंद्राचा उपयोग काय, असा प्रश्न नागरिक उपस्थित करीत आहेत. विशेष म्हणजे, या प्राथमिक आरोग्य केंद्रावर अवलंबून असलेल्या ग्रामीण भागातील नागरिकांना रात्रीच्या वेळी खासगी वाहनांची व्यवस्था करावी लागते. अनेकदा आर्थिक परिस्थिती हलाखीची असल्याने रुग्णांना वेळेत उपचार मिळत नाहीत. त्यामुळे गंभीर रुग्णांच्या जीवाला धोका निर्माण होण्याची शक्यता वाढत असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. या पार्श्वभूमीवर पातोंडा प्राथमिक आरोग्य केंद्रात कायमस्वरूपी निवासी वैद्यकीय अधिकारी नियुक्त करण्यात यावेत, डॉक्टरांनी शासनाच्या नियमांनुसार निवासी इमारतीत वास्तव्यास राहावे आणि चोवीस तास आपत्कालीन आरोग्य सेवा उपलब्ध करून द्यावी, अशी जोरदार मागणी ग्रामस्थांनी जिल्हा आरोग्य प्रशासन आणि शासनाकडे केली आहे. तसेच या प्रश्नाची तातडीने दखल घेऊन ग्रामीण भागातील नागरिकांना दर्जेदार आणि अखंड आरोग्य सेवा मिळावी, अशी अपेक्षाही व्यक्त करण्यात येत आहे.

 

Author photo

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *