
कृषि विभाग व एकचक्र शेतकरी उत्पादक कंपनीतर्फे धार येथे चिया शेतीचा प्रयोग
अमळनेर (प्रतिनिधी) तालुक्यातील धार गावामध्ये एकचक्र शेतकरी उत्पादक कंपनी लिमिटेड यांच्या वतीने चिया पिकाची लागवड करून नाविन्यपूर्ण कृषी उपक्रम राबविण्यात येत आहे. पारंपरिक पिकांव्यतिरिक्त शेतकऱ्यांना अधिक उत्पन्न देणाऱ्या व बाजारात वाढती मागणी असलेल्या पिकांकडे वळविण्याच्या उद्देशाने हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे.
या चिया शेती प्रकल्पाला तालुका कृषी अधिकारी चंद्रकांत ठाकरे, मंडळ कृषी अधिकारी अतुल मते, पंचायत समितीचे कृषी अधिकारी देवेंद्र ठाकूर, एकचक्र शेतकरी उत्पादक कंपनी लि. चे संचालक रोहन पाटील, उज्वल पाटील तसेच प्रयोगशील शेतकरी शंकर पाटील यांनी प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केली.
यावेळी अधिकाऱ्यांनी चिया पिकाची लागवड पद्धत, लागवडीसाठी लागणारे बियाणे, पाणी व्यवस्थापन, खत व्यवस्थापन तसेच उत्पादन व बाजारपेठ याबाबत सविस्तर माहिती घेतली. चिया हे आरोग्यदृष्ट्या अत्यंत पौष्टिक पीक असून देशांतर्गत तसेच आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत त्याला मोठी मागणी आहे. त्यामुळे भविष्यात हे पीक शेतकऱ्यांसाठी आर्थिकदृष्ट्या फायदेशीर ठरू शकते, असे मत उपस्थित अधिकाऱ्यांनी व्यक्त केले. एकचक्र शेतकरी उत्पादक कंपनीमार्फत शेतकऱ्यांना आधुनिक शेती तंत्रज्ञान, मार्गदर्शन, दर्जेदार बियाणे तसेच उत्पादनाच्या विक्रीसाठी बाजारपेठ उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केला जात आहे. या उपक्रमामुळे परिसरातील इतर शेतकरी देखील चिया पिकाकडे आकर्षित होत असून शेतीत नवे प्रयोग करण्यास प्रेरणा मिळत आहे.
या नाविन्यपूर्ण उपक्रमामुळे शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढण्यास मदत होणार असून चोपडा तालुका चिया शेतीसाठी एक नवा आदर्श निर्माण करेल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली.

Leave a Reply