द्वारकानगरमध्ये पिसाळलेल्या कुत्र्यांचा हैदोस; पालिकेच्या दुर्लक्षामुळे नागरिकांचा जीव धोक्यात!

स्मरणपत्रांनंतरही कारवाई शून्य; गरोदर महिला व ज्येष्ठ नागरिकांवर हल्ल्याचा प्रयत्न

 

अमळनेर (प्रतिनिधी) शहरातील द्वारकानगर परिसरात पिसाळलेल्या भटक्या कुत्र्यांचा अक्षरशः हैदोस सुरू असून नागरिकांना घराबाहेर पडणेही मुश्किल झाले आहे. दिवसेंदिवस वाढत चाललेल्या या समस्येकडे नगरपालिका प्रशासनाने पूर्णपणे डोळेझाक केल्याचा संतापजनक आरोप स्थानिक रहिवाशांनी केला आहे. दोन महिन्यांपूर्वी लेखी तक्रार देऊनही कोणतीही ठोस कारवाई झाली नाही. उलट दहा दिवसांपूर्वी पुन्हा स्मरणपत्र देऊनही प्रशासनाने केवळ आश्वासनांचीच पुडकी फोडली, अशी तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, बुधवारी सकाळी परिस्थिती अधिकच गंभीर बनली. परिसरातील एका गरोदर महिलेमागे पिसाळलेले कुत्रे लागल्याची धक्कादायक घटना घडली. सुदैवाने नागरिकांनी धाव घेतल्याने मोठा अनर्थ टळला. त्याच वेळी ६५ वर्षीय एका महिलेच्या मागेही कुत्र्यांचा कळप लागला. स्वतःचा बचाव करण्याच्या प्रयत्नात त्या महिला रस्त्यावर कोसळल्या. या घटनेमुळे परिसरात भीतीचे सावट अधिकच गडद झाले आहे. एखादी मोठी दुर्घटना घडल्यानंतरच प्रशासन जागे होणार का, असा संतप्त सवाल नागरिक करत आहेत.

लहान मुलांची अवस्था तर अधिक बिकट आहे. शाळेत किंवा ट्युशनला जाण्यासाठी घराबाहेर पडताना मुलांच्या मनात भीतीचे वातावरण आहे. पालकांना स्वतः सोबत जावे लागत आहे. संध्याकाळी तर परिस्थिती आणखी भयावह होते. कुत्र्यांचे टोळके रस्त्यांवर मुक्तपणे हिंडताना दिसतात. भुंकणे, पाठलाग करणे आणि अचानक झडप घालण्याच्या प्रकारामुळे नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. या संपूर्ण प्रकरणात सर्वात धक्कादायक बाब म्हणजे नगरपालिकेचे सातत्याने होत असलेले दुर्लक्ष. दोन महिन्यांपूर्वी नागरिकांनी लेखी तक्रार देऊन भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी केली होती. मात्र एकही प्रभावी उपाययोजना राबविण्यात आलेली नाही. दहा दिवसांपूर्वी पुन्हा स्मरणपत्र देण्यात आले, तरीही प्रशासन सुस्तच आहे. नगरपालिकेच्या आरोग्य विभागाने कुत्र्यांचे निर्बंध, लसीकरण किंवा पकड मोहीम राबविणे अपेक्षित असताना त्याकडे पूर्ण दुर्लक्ष झाल्याचे चित्र आहे. नागरिकांच्या जीविताशी संबंधित हा गंभीर प्रश्न असताना प्रशासनाची ही निष्क्रियता संतापजनक ठरत आहे. परिसरातील रहिवाशांनी तात्काळ विशेष पथक नेमून पिसाळलेल्या कुत्र्यांना पकडण्याची आणि सुरक्षिततेची हमी देण्याची मागणी केली आहे.

जर तातडीने उपाययोजना करण्यात आल्या नाहीत, तर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा नागरिकांनी दिला आहे. एखादी जीवितहानी झाल्यानंतरच प्रशासन जागे होणार का, हा प्रश्न सध्या द्वारका नगरमध्ये संतप्त चर्चेचा विषय ठरला आहे.

 

Author photo

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *