खून प्रकरणातील आरोपीला हायकोर्टाचा दिलासा; १० वर्षांच्या शिक्षेला स्थगिती

अमळनेर (प्रतिनिधी) चोपडा तालुक्यातील देवगाव येथील खून प्रकरणात अमळनेर सत्र न्यायालयाने शिक्षा सुनावलेल्या आरोपीला औरंगाबाद येथील हायकोर्टाकडून मोठा दिलासा मिळाला आहे.  १० वर्षांच्या शिक्षेला स्थगिती दिली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, अडावद पोलिस ठाण्यात दाखल गुन्ह्यातील आरोपी चंद्रशेखर नामदेव सपकाळे याला यापूर्वी अमळनेर येथील सत्र न्यायालयाने दोषी ठरवत १० वर्षांची शिक्षा सुनावली होती. मात्र या शिक्षेविरोधात दाखल केलेल्या अपीलावर सुनावणी करताना हायकोर्टाने सदर शिक्षेला स्थगिती देत आरोपीला जामीनावर मुक्त करण्याचे आदेश दिले आहेत.

प्राप्त माहितीनुसार, फिर्यादी भावना रवींद्र पाटील यांच्या तक्रारीनुसार १४ ऑक्टोबर २०२१ रोजी संध्याकाळच्या सुमारास त्यांचे पती रवींद्र पाटील हे दारूच्या नशेत घरी आले होते. त्यावेळी घरात वाद सुरू असताना आरोपी चंद्रशेखर सपकाळे याला गैरसमज झाला की रवींद्र त्यालाच शिवीगाळ करत आहेत. या संतापातून आरोपीने रवींद्र यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केली तसेच शिंगड्याने पोट व छातीवर गंभीर प्रहार केले. या हल्ल्यात रवींद्र पाटील यांचा मृत्यू झाला.

या घटनेप्रकरणी अडावद पोलिसांनी भारतीय दंड संहितेच्या कलम ३०२ अन्वये गुन्हा दाखल केला होता. पुढील सुनावणीत अमळनेर सत्र न्यायालयाने आरोपीला दोषी ठरवत कलम ३०४ (२) अंतर्गत १० वर्षांची साधी कैद आणि ५ हजार रुपयांचा दंड अशी शिक्षा सुनावली होती. दरम्यान, या शिक्षेविरोधात आरोपीने औरंगाबाद हायकोर्टात फौजदारी अपील दाखल केले होते. या अपीलावर प्राथमिक सुनावणीदरम्यान हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती देत आरोपीला जामीन मंजूर केला. या प्रकरणात आरोपीच्या बाजूने अॅड. सूनयना निनाद पाटील यांनी प्रभावी युक्तिवाद केला, तर अॅड. प्रकाशसिंग बी. पाटील यांचे मार्गदर्शन लाभले. या निर्णयामुळे जिल्ह्यातील कायदेविषयक वर्तुळात चर्चा रंगली असून पुढील सुनावणीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

 

Author photo

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *