
उकाड्याची झळ अन् आगींचा भडका ; अमळनेर शहर-तालुक्यात तीन महिन्यांत ५८ आगकांडच्या घटना
अमळनेर (प्रतिनिधी) प्रचंड उकाड्यामुळे नागरिक हैराण झाले असतानाच अमळनेर शहर आणि तालुक्यात आगीच्या घटनांमध्येही चिंताजनक वाढ झाली आहे. मार्च ते मे या अवघ्या तीन महिन्यांच्या कालावधीत शहर व ग्रामीण भागात मिळून तब्बल ५८ लहान-मोठ्या आगीच्या घटनांची नोंद झाली आहे. घरगुती ठिकाणे, दुकाने आणि शेतशिवारांमध्ये लागलेल्या आगींमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
पालिकेच्या हद्दीत ३७ तर ग्रामीण भागात २१ अशा एकूण ५८ घटनांनी अग्निशमन विभागालाही सतर्क ठेवले आहे. यंदा अमळनेरसह जिल्ह्यात तापमानाचा पारा ४४ अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचल्याने नागरिकांकडून पंखे, कुलर आणि वातानुकूलित यंत्रणांचा मोठ्या प्रमाणावर वापर होत आहे. उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमुळे बहुतांश नागरिक घरातच राहत असल्याने इलेक्ट्रिक आणि इलेक्ट्रॉनिक उपकरणांचा वापर वाढला असून त्यामुळे विद्युत यंत्रणेवर अतिरिक्त ताण निर्माण होत आहे. याच अतिवापरामुळे शॉर्ट सर्किट होऊन आगी लागण्याच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याचे समोर आले आहे. अनेक घरांमधील जुनी वायरिंग, ओव्हरलोडिंग आणि सतत सुरू असलेली उपकरणे हेही आगीमागील प्रमुख कारण ठरत आहेत.
विजेचा अतिवापर ठरतोय धोक्याचा
उन्हाळ्यात वाढत्या तापमानामुळे शीतकरणाच्या उपकरणांचा वापर मोठ्या प्रमाणावर वाढतो. एकाचवेळी अनेक उपकरणे सुरू राहिल्याने विजेच्या यंत्रणेवर मोठा ताण येतो. उष्णता आणि ओव्हरलोडिंगमुळे शॉर्ट सर्किट होऊन क्षणार्धात आगीचा भडका उडतो. विशेषतः जुनी वायरिंग असलेल्या घरांमध्ये हा धोका अधिक वाढला आहे. त्यामुळे नागरिकांनी वेळोवेळी विद्युत यंत्रणेची तपासणी करून आवश्यक ती खबरदारी घेणे गरजेचे बनले आहे.
अग्निशमन दलाचे नागरिकांना आवाहन
वाढत्या आगीच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर पालिकेच्या अग्निशमन विभागाने नागरिकांना सतर्कतेचे आवाहन केले आहे. वापर नसताना विद्युत उपकरणे बंद ठेवावीत, घराबाहेर पडताना मेन स्विच आणि सर्व बटणे बंद असल्याची खात्री करावी, तसेच विजेचा वापर गरजेपुरताच करावा, असे आवाहन करण्यात आले आहे. आगीची घटना घडल्यास घाबरून न जाता तातडीने अग्निशमन विभागाशी संपर्क साधण्याचेही आवाहन प्रशासनाने केले आहे.
अग्निशमन विभाग नेहमी तत्पर
“पालिकेच्या अग्निशमन विभागात ५ हजार लिटर क्षमतेचे २ अत्याधुनिक अग्निशमन बंब व १ हजार ३०० लिटर क्षमतेची दोन वाहने, तसेच दोन फायर बुलेट अशी एकूण सहा वाहने उपलब्ध आहेत. एक अग्निशमन अधिकारी, तीन फायरमन, चार अग्निशमन वाहन चालक व पाच मदतनीस असे एकूण १३ कर्मचारी शहरासह ग्रामीण भागात २४ तास अत्यावश्यक सेवा देत आहेत.”
–गणेश गोसावी, अग्निशमन अधिकारी, नगरपरिषद अमळनेर

Leave a Reply