मारवड पोलिस स्टेशन हद्दीत गावठी दारूचा सुळसुळाट; पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह

अमळनेर (प्रतिनिधी) तालुक्यातील मारवड पोलिस स्टेशन हद्दीत गावठी दारूचा अवैध धंदा दिवसेंदिवस वाढत असल्याची गंभीर बाब समोर येत आहे. अनेक गावांमध्ये उघडपणे गावठी दारूची विक्री सुरू असून या बेकायदेशीर धंद्यामुळे गरीब कुटुंबांचे संसार उद्ध्वस्त होत असल्याचे चित्र आहे. मात्र एवढ्या मोठ्या प्रमाणावर सुरू असलेल्या या प्रकाराकडे पोलिस प्रशासनाने दुर्लक्ष केल्याचा आरोप स्थानिक नागरिकांकडून केला जात आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, काही ठिकाणी दिवसाढवळ्या गावठी दारूची विक्री सुरू असते. काही भागांमध्ये तर दारू तयार करण्याचे अड्डेही सुरू असल्याची चर्चा आहे. या धंद्यामुळे परिसरातील अनेक कुटुंबे आर्थिक संकटात सापडत असून घरातील पुरुष दारूच्या आहारी गेल्याने महिलांना व मुलांना मोठ्या हालअपेष्टा सहन कराव्या लागत आहेत. गावातील महिलांनी या प्रकाराबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. “घर चालवण्यासाठी दिवसभर मजुरी करावी लागते, पण पुरुष कमावलेले पैसे दारूत उडवतात. त्यामुळे घरात भांडणे, मारहाण आणि उपासमारीची वेळ येते,” अशी व्यथा काही महिलांनी व्यक्त केली. या अवैध दारू विक्रीमुळे परिसरातील तरुण पिढीही मोठ्या प्रमाणावर व्यसनाच्या गर्तेत ओढली जात असल्याची चिंता व्यक्त होत आहे. शिक्षण, रोजगार आणि भविष्याकडे लक्ष देण्याऐवजी काही तरुण दारूच्या आहारी जात असल्याने समाजात गंभीर परिस्थिती निर्माण होत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.

 

कारवाईची जोरदार मागणी

 

दरम्यान, एवढ्या मोठ्या प्रमाणावर सुरू असलेल्या गावठी दारूच्या धंद्याकडे मारवड पोलीस स्टेशन प्रशासनाने अद्याप ठोस कारवाई का केली नाही, असा सवाल नागरिक उपस्थित करत आहेत. काही नागरिकांच्या मते, या अवैध धंद्याला कुणाचे तरी पाठबळ असल्याची कुजबुजही परिसरात सुरू आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हा पोलिस प्रशासनाने या प्रकरणाची तातडीने चौकशी करून मारवड पोलिस स्टेशन हद्दीत सुरू असलेल्या गावठी दारूच्या अवैध धंद्यावर कठोर कारवाई करावी, अशी जोरदार मागणी स्थानिक नागरिकांकडून केली जात आहे.

 

Author photo

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *