
टाकरखेड्यातील चौघांच्या मृत्यूला नवे वळण; मानसिक त्रास व धमक्यांच्या आरोपावरून एकास अटक
खौशी येथे तलावात बाप-लेकाचा बुडून मृत्यू

अमळनेर (प्रतिनिधी) : अमळनेर तालुक्यात गुरुवारी पहाटे आणि सकाळच्या सुमारास घडलेल्या दोन हृदयद्रावक घटनांनी संपूर्ण तालुका हादरला आहे. टाकरखेडा येथे एकाच कुटुंबातील चौघांचा रेल्वेखाली दुर्दैवी अंत झाल्याची घटना ताजी असतानाच, खौशी येथे मुलाला वाचविण्याच्या प्रयत्नात वडिलांसह मुलाचाही तलावात बुडून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली. दरम्यान, टाकरखेडा येथील चौघांच्या मृत्यूच्या प्रकरणाला आता नवे वळण मिळाले असून, मानसिक त्रास व धमक्यांमुळे कुटुंबाने टोकाचे पाऊल उचलल्याचा आरोप करत एका व्यक्तीविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी सीताराम उर्फ गटलु ताणकु भिल याला अटक केली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, तालुक्यातील टाकरखेडा येथे बुधवार, दि. २७ ऑगस्ट रोजी पहाटे सुनील अमृत भिल आणि त्यांची पत्नी पार्वती सुनील भिल यांनी त्यांच्या दोन चिमुकल्या मुलांसह रेल्वेखाली जीवन संपवल्याची हृदयद्रावक घटना घडली. या घटनेत दांपत्यासह त्यांचा मुलगा सनी आणि चिमुकला राज यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. प्राथमिक माहितीनुसार, सुनील भिल, त्यांची पत्नी पार्वती आणि मुले सनी व राज हे पहाटे सुमारे चार वाजेच्या सुमारास घरातून बाहेर पडले होते. त्यानंतर रेल्वे रुळावर ही दुर्घटना घडली. पहाटे सुमारे ४.४० वाजता रेल्वे अधिकाऱ्यांनी पोलिसांना घटनेची माहिती दिली.
मृतांमध्ये दुसरी इयत्तेत शिकणारा सनी आणि अंगणवाडीत जाणारा चिमुकला राज यांचा समावेश होता. एकाच कुटुंबातील चौघांचा एकाच वेळी मृत्यू झाल्याने टाकरखेडा गावावर शोककळा पसरली. घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम यांच्या मार्गदर्शनाखाली एपीआय गणेश अहिरे, हेडकॉन्स्टेबल संदेश पाटील, विजय भोई, योगेश बागुल आणि राहुल पाटील यांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. सुरुवातीला या कुटुंबाने एवढे टोकाचे पाऊल का उचलले, याचे नेमके कारण स्पष्ट झाले नव्हते.
मानसिक त्रास व धमक्यांचा आरोप; एकास अटक
या प्रकरणात मृत सुनील अमृत भिल यांची बहीण सरलाबाई यांनी पोलिसांत फिर्याद दिली आहे. फिर्यादीनुसार, टाकरखेडा येथील सीताराम उर्फ गटलु ताणकु भिल हा सुनील यांना, “तुझ्या बायकोसोबत माझे लफडे असून तू आडवा येऊ नको, नाहीतर तुला आणि तुझ्या मुलांना मारून टाकेल,” अशी धमकी देत होता. या प्रकारातून सुनील यांना सातत्याने मानसिक त्रास दिला जात असल्याचा आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे.
२६ ऑगस्ट रोजी सुनील यांनी फोनवरून आपल्याला होत असलेल्या त्रासाबाबत माहिती दिली होती, असेही सरलाबाई यांनी फिर्यादीत नमूद केले आहे. सीताराम याच्या कथित मानसिक त्रासामुळे सुनील, त्यांची पत्नी आणि दोन मुलांनी आत्महत्या केल्याची तक्रार सरलाबाई यांनी केली. या फिर्यादीवरून सीताराम उर्फ गटलु ताणकु भिल याच्याविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिसांनी त्याला अटक केली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास एपीआय गणेश अहिरे करीत आहेत.
खौशी येथे तलावात बाप-लेकाचा बुडून मृत्यू
दरम्यान, अमळनेर तालुक्यातील खौशी येथेही गुरुवारी काळजाचा ठोका चुकवणारी घटना घडली. तलावात मुलगा बुडत असल्याचे लक्षात आल्यानंतर त्याला वाचविण्यासाठी पाण्यात उतरलेल्या वडिलांचाही बुडून मृत्यू झाला. प्राथमिक माहितीनुसार, तलावातील गाळात मुलगा फसल्याचे वडिलांच्या लक्षात आले. मुलाला वाचविण्यासाठी ते तत्काळ पाण्यात उतरले. मात्र, मुलाला बाहेर काढण्याच्या प्रयत्नात ते स्वतःही गाळात फसले. या दुर्घटनेत बाप-लेकाचा दुर्दैवी बुडून मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच गावकऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत दोघांना पाण्यातून बाहेर काढले. त्यानंतर दोन्ही मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात आणण्यात आले. या घटनेने खौशी गावावरही शोककळा पसरली आहे. एकाच दिवशी अमळनेर तालुक्यात घडलेल्या या दोन हृदयद्रावक घटनांनी नागरिकांमध्ये हळहळ व्यक्त होत आहे.

Leave a Reply