जय योगेश्वर विद्यालयात वृक्षारोपण; विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा उत्स्फूर्त सहभाग

अमळनेर (प्रतिनिधी) : पर्यावरण संवर्धनासोबतच विद्यार्थ्यांमध्ये निसर्गाविषयी जाणीव आणि पर्यावरण साक्षरता निर्माण करण्यासाठी शालेय स्तरावर वृक्षारोपण व वृक्षसंवर्धनाचे उपक्रम राबविणे काळाची गरज आहे. याच उद्देशाने जय योगेश्वर विद्यालय, अमळनेर येथे २७ ऑगस्ट रोजी वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमात विद्यार्थी, शिक्षक, शिक्षिका आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.

विद्यालयाचे मुख्याध्यापक के. डी. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रमाची सुरुवात झाली. उपस्थित प्रा. डॉ. नयना कैलास पाटील आणि उपक्रमशील शिक्षिका स्मिता सुखदेवराव वानखडे यांच्या हस्ते विद्यालयाच्या परिसरात निम वृक्षांची लागवड करण्यात आली. यावेळी विद्यार्थ्यांना वृक्षसंवर्धन, पर्यावरण संरक्षण तसेच प्लास्टिकमुक्त परिसर याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. संशोधक मार्गदर्शिका प्रा. डॉ. नयना वाणी यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यालयात पर्यावरण संवर्धनाशी संबंधित विविध उपक्रम सातत्याने राबविण्यात येत आहेत. विद्यार्थ्यांना केवळ पाठ्यपुस्तकातून पर्यावरणाचे महत्त्व न सांगता प्रत्यक्ष कृतीतून त्याची जाणीव करून देण्याचा प्रयत्न या उपक्रमातून करण्यात आला. यावेळी प्रा. डॉ. नयना कैलास पाटील यांनी वाढते प्रदूषण, मोठ्या प्रमाणातील वृक्षतोड आणि बदलते हवामान यामुळे पर्यावरणासमोर गंभीर आव्हाने निर्माण झाली असल्याचे सांगितले. “झाडे लावा, झाडे जगवा” हा संदेश देत पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण करणे आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

उपक्रमशील शिक्षिका स्मिता सुखदेवराव वानखडे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना, “वृक्ष हे पर्यावरणाचा आधार असून प्रत्येकाने किमान एक तरी झाड लावून त्याचे संगोपन करावे. केवळ झाडे लावणे महत्त्वाचे नाही, तर लावलेली झाडे जगवणे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे,” असे सांगितले.

वृक्षारोपणाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरण संवर्धनाची भावना रुजविण्यासोबतच निसर्गाविषयी प्रेम, जबाबदारी आणि जागरूकता निर्माण करण्याचा संदेश देण्यात आला. विद्यालय परिसर अधिक हिरवागार करण्यासाठी विद्यार्थ्यांनीही झाडांची नियमित काळजी घेण्याचा संकल्प केला. या कार्यक्रमास प्रा. पी. डी. पाटील, प्रा. अरुण महाजन, प्रा. संतोष शिंगाणे, प्रा. संजय पाटील, प्रा. कल्पना पाटील, प्रा. उत्तरा पाटील, प्रा. रत्नमाला कुवर, प्रा. वैशाली भदाणे, प्रा. पुनम वाघ यांच्यासह विद्यार्थी, शिक्षक, शिक्षिका आणि शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

 

Author photo

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *