
मारवड व परिसर विकास मंच व धार–मालपूर विकास मंच यांच्या संयुक्त विद्यमाने उद्या १००८ रोपांचे भव्य महावृक्षारोपण
अमळनेर (प्रतिनिधी) पर्यावरण संवर्धनाचा संदेश जनतेपर्यंत पोहोचवत “हरित धरती, समृद्ध भविष्य” या संकल्पनेतून मारवड व परिसर विकास मंच आणि धार–मालपूर विकास मंच यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवार, दि. ८ ऑगस्ट २०२६ रोजी शिवटेकडी येथे १००८ रोपांचे भव्य महावृक्षारोपण आयोजित करण्यात आले आहे. या उपक्रमातून शिवटेकडी परिसर हिरवागार करण्याचा संकल्प करण्यात आला असून नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
या हरित अभियानाची सुरुवात दुपारी ३.०० वाजता महादेव मंदिर येथून भव्य वृक्षदिंडीने होणार आहे. महादेव मंदिरापासून शिवटेकडीपर्यंत निघणाऱ्या या वृक्षदिंडीत पर्यावरण संवर्धनाचे संदेश देत नागरिकांमध्ये वृक्षारोपणाबाबत जनजागृती केली जाणार आहे.
त्यानंतर सायंकाळी ५.०० वाजता शिवटेकडीवर १००८ रोपांचे महावृक्षारोपण करण्यात येणार आहे. यामध्ये सावली देणारी, फळझाडे तसेच पर्यावरणपूरक विविध वृक्षांची लागवड करून परिसर अधिक हिरवागार आणि समृद्ध करण्याचा संकल्प पूर्ण केला जाणार आहे.
या उपक्रमाचा उद्देश केवळ वृक्ष लागवड करणे नसून पर्यावरण संरक्षण, सामाजिक एकात्मता, नैसर्गिक संतुलन राखणे आणि भावी पिढ्यांसाठी हरित वारसा निर्माण करणे हा आहे. “एक वृक्ष… एक संकल्प… हजारो जीवांचे रक्षण” हा संदेश देत प्रत्येक नागरिकाने किमान एक तरी वृक्ष लावून त्याचे संगोपन करण्याची जबाबदारी स्वीकारावी, असेही आयोजकांनी नमूद केले आहे.
या महावृक्षारोपण अभियानात परिसरातील नागरिक, युवक, महिला, विद्यार्थी, विविध सामाजिक संस्था तसेच पर्यावरणप्रेमींनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन हरित चळवळीला बळ द्यावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
कार्यक्रमाचे वेळापत्रक
दुपारी ३.०० वा. – महादेव मंदिर येथून शिवटेकडीपर्यंत भव्य वृक्षदिंडी.
सायंकाळी ५.०० वा. – शिवटेकडी येथे १००८ रोपांचे भव्य महावृक्षारोपण.
“चला… एकत्र येऊया, शिवटेकडीला हरित बनविण्याचा संकल्प करूया!”

Leave a Reply