पुराच्या घाणीने अमरधामची दुरवस्था; २६ दिवसांनंतरही स्वच्छतेचा पडला विसर !

अमळनेर (प्रतिनिधी) : शहरातील मारवड रोडवरील क्रीडा संकुलाशेजारी पिंपळे नाल्यालगत असलेल्या नगरपरिषदेच्या अमरधामची ३१ जुलै रोजी आलेल्या पुरामुळे मोठ्या प्रमाणावर दुरवस्था झाली आहे. पुराच्या पाण्यासोबत वाहून आलेली घाण, गाळ व कचरा अमरधाम परिसरात साचून पडलेला असताना पुराला तब्बल २६ दिवस उलटूनही नगरपरिषद प्रशासनाकडून अपेक्षित स्वच्छता न झाल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. अंत्यविधीसारख्या संवेदनशील प्रसंगीही नागरिकांना अस्वच्छता आणि गैरसोयीचा सामना करावा लागत असल्याचे चित्र आहे.

अमरधामच्या मुख्य प्रवेशमार्गाचीही पुरामुळे मोठी हानी झाली असून, मुख्य रस्त्यापासून अमरधामकडे जाणारा रस्ताच वाहून गेला आहे. त्यामुळे अंत्यविधीसाठी मृतदेह अमरधामपर्यंत नेणे नागरिकांसाठी जिकिरीचे ठरत आहे. रस्त्याची दुरवस्था झाल्याने अमरधामचा वापर करणेही अडचणीचे झाले आहे.

मारवड रोड परिसरातील ज्ञानेश्वर कॉलनी, अयोध्या नगर, बंगाली फाईल, रामवाडी, केशवनगर, मिलचाळ तसेच गलवाडे रोड परिसरातील नागरिकांसाठी हे अमरधाम जवळचे व सोयीचे आहे. मात्र, अमरधामची झालेली दुरवस्था आणि वाहून गेलेल्या रस्त्यामुळे नागरिकांना अंत्यसंस्कारासाठी शहराच्या दुसऱ्या टोकावरील चोपडा रोडवरील अमरधामचा आधार घ्यावा लागत असल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. पुराच्या पाण्यासोबत आलेला गाळ, कचरा व घाण परिसरात साचलेली असतानाच अंत्यसंस्कारासाठी वापरण्यात येणारा लोखंडी बेडही गाळ व घाणीने माखला आहे. हा बेड स्वच्छ करून पूर्ववत करण्यासह अंत्यसंस्कारासाठी आवश्यक मूलभूत सुविधांची तातडीने साफसफाई व दुरुस्ती करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.

 

तात्पुरत्या डागडुजीऐवजी कायमस्वरूपी उपाययोजना हवी

 

पिंपळे नाल्यालगतच अमरधाम असल्याने पावसाळ्यात पुराच्या पाण्याचा या परिसराला वारंवार फटका बसण्याची शक्यता आहे. त्यामुळे यावेळी केवळ तात्पुरती डागडुजी करून प्रश्न सोडविण्याऐवजी कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची गरज नागरिकांनी व्यक्त केली आहे. अमरधामच्या नाल्यालगत मजबूत संरक्षण भिंत उभारावी, मुख्य रस्त्यापासून अमरधामपर्यंत काँक्रीटचा पक्का रस्ता तयार करावा, तसेच परिसरात सोलर हायमास्ट लॅम्पची सुविधा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी होत आहे. या उपाययोजनांमुळे भविष्यात पुराचा फटका बसला तरी अमरधामकडे जाणारा मार्ग सुरक्षित राहण्यास मदत होईल, अशी अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली आहे.

 

‘संवेदनशील ठिकाणाकडे दुर्लक्ष का?

 

पुरानंतर शहरातील विविध भागांमध्ये स्वच्छता मोहीम राबविण्यात आली असताना अमरधामसारख्या अत्यंत संवेदनशील ठिकाणाकडे २६ दिवसांनंतरही दुर्लक्ष का करण्यात आले, असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. मृतांच्या अंत्यसंस्कारासाठी वापरल्या जाणाऱ्या ठिकाणी एवढ्या मोठ्या प्रमाणात घाण, गाळ आणि कचरा साचून राहणे ही गंभीर बाब असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. अमरधाममधील घाण, गाळ व कचरा तातडीने हटवून संपूर्ण परिसराची स्वच्छता व निर्जंतुकीकरण करावे, अंत्यसंस्काराचा लोखंडी बेड स्वच्छ करून पूर्ववत करावा आणि वाहून गेलेल्या रस्त्याची तातडीने दुरुस्ती करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

 

आवश्यक ती स्वच्छता व दुरुस्ती करू

 

“पुरामुळे अमरधाम परिसरात झालेली दुरवस्था व वाहून गेलेल्या रस्त्याची पाहणी करून आवश्यक ती स्वच्छता व दुरुस्तीची कार्यवाही करण्यात येईल. अमरधाम परिसर नागरिकांच्या वापरासाठी सुरळीत करण्याला प्राधान्य देण्यात येईल.”

गणेश शिंदे, मुख्याधिकारी, अमळनेर नगरपरिषद

 

कायमस्वरूपी उपाययोजना करावी

“ज्ञानेश्वर कॉलनी, अयोध्या नगर, बंगाली फाईल, रामवाडी, केशवनगर, मिलचाळ व गलवाडे रोड परिसरातील नागरिकांसाठी हे अमरधाम अत्यंत महत्त्वाचे आहे. पुरानंतर २६ दिवस उलटूनही येथे स्वच्छता न होणे ही गंभीर बाब आहे. अंत्यसंस्कारासाठी नागरिकांची गैरसोय होऊ नये यासाठी तातडीने स्वच्छता करून रस्ता दुरुस्त करावा. भविष्यात पुन्हा पुराचा फटका बसू नये यासाठी नाल्यालगत संरक्षण भिंत व पक्का काँक्रीट रस्ता उभारण्याची कायमस्वरूपी उपाययोजना करावी. तसेच सोलर हायमास्टची सोय करावी.”

– भारती नरेंद्र चौधरी, माजी नगराध्यक्षा, नगरपरिषद अमळनेर

 

Author photo

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *