
अमळनेर तालुक्यात चोरट्यांचा धुमाकूळ; जानवे, स्वामी समर्थ मंदिर परिसरात घरफोड्या
अमळनेर (प्रतिनिधी) तालुक्यात अज्ञात चोरट्यांनी बंद घरांना लक्ष्य करत घरफोड्या केल्याच्या दोन घटना समोर आल्या आहेत. जानवे येथे घराचे कुलूप तोडून सोन्या-चांदीचे दागिने लंपास करण्यात आले, तर स्वामी समर्थ मंदिरासमोरील दत्त हौसिंग सोसायटीमध्येही बंद घराचे कुलूप तोडून सोन्याचे बिस्कीट आणि चांदीचे दागिने चोरून नेण्यात आले. या दोन्ही घटनांमुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, जानवे येथील सुरेश गोबा पाटील यांनी ६ ऑगस्ट रोजी रात्री त्यांच्या घराच्या खालच्या मजल्याला कुलूप लावले होते. त्यानंतर ते वरच्या मजल्यावर झोपण्यासाठी गेले. मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी घराचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. चोरट्यांनी घरातील सोन्या-चांदीच्या दागिन्यांवर डल्ला मारला. चोरट्यांनी १० हजार रुपये किमतीचे पाच ग्रॅम सोन्याचे झुमके, १० हजार रुपये किमतीची पाच ग्रॅम सोन्याची अंगठी, सहा हजार रुपये किमतीचे तीन ग्रॅम सोन्याचे काप, पाच हजार रुपये किमतीचे चांदीचे पैंजण, दोन हजार ५०० रुपयांचे चांदीचे पैंजण आणि दोन हजार ५०० रुपयांचा चांदीचा करदोडा असा ऐवज लंपास केला.
या प्रकरणी अमळनेर पोलीस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून हेडकॉन्स्टेबल मिलिंद सोनार तपास करीत आहेत. तालुक्यात एकाच वेळी दोन ठिकाणी घरफोड्या झाल्याने बंद घरे आणि घरांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. अज्ञात चोरट्यांचा शोध घेऊन त्यांना तातडीने जेरबंद करण्याचे आव्हान पोलिसांसमोर आहे.
पतीच्या उपचारासाठी धुळ्याला गेल्या अन् घर फोडले
दुसरी घटना स्वामी समर्थ मंदिरासमोरील दत्त हौसिंग सोसायटीमध्ये घडली. सुशीलाबाई अशोक पाटील यांचे पती आजारी असल्याने त्या त्यांना उपचारासाठी धुळे येथे घेऊन गेल्या होत्या. घर बंद असल्याची संधी साधत अज्ञात चोरट्यांनी घराचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. चोरट्यांनी घरातील २० हजार रुपये किमतीचे १० ग्रॅम सोन्याचे बिस्कीट तसेच आठ हजार रुपये किमतीचे चांदीचे जोडवे, ब्रेसलेट आणि पैंजण असा ऐवज चोरून नेला. या घटनेप्रकरणीही अमळनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून हेडकॉन्स्टेबल सुनील तेली तपास करीत आहेत.

Leave a Reply