साने गुरुजी शाळेच्या विद्यार्थिनींच्या राख्या सीमेवरील जवानांना रवाना

अमळनेर (प्रतिनिधी) : विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक, भावनिक आणि सर्जनशील कौशल्यांसोबतच देशप्रेमाची भावना रुजावी, या उद्देशाने साने गुरुजी कन्या हायस्कूलमध्ये ‘आनंददायी शनिवार’ हा उपक्रम उत्साहात साजरा करण्यात आला. या उपक्रमांतर्गत शाळेतील विद्यार्थिनींनी स्वतः तयार केलेल्या राख्या सीमेवरील जवानांसाठी पाठविण्यात आल्या.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे सचिव संदीप घोरपडे होते. मुख्याध्यापिका अनिता बोरसे यांच्यासह शिक्षकवृंद उपस्थित होते. प्रास्ताविकातून मुख्याध्यापिका अनिता बोरसे यांनी ‘आनंददायी शनिवार’ उपक्रमामागील उद्देश स्पष्ट केला. विद्यार्थ्यांचे मानसिक, सामाजिक व भावनिक कौशल्य, व्यावसायिक कौशल्य तसेच संभाषण कौशल्य विकसित करण्यासाठी शाळेत विविध उपक्रमांचे आयोजन केले जाते, असे त्यांनी सांगितले. या उपक्रमाचा भाग म्हणून विद्यार्थिनींनी सीमेवर देशाचे रक्षण करणाऱ्या जवानांसाठी आकर्षक व सुंदर राख्या स्वतः तयार केल्या. या राख्या जवानांना पाठविण्यात आल्या. आपल्या हाताने तयार केलेली राखी देशाच्या सीमेवर तैनात असलेल्या जवानांपर्यंत पोहोचणार असल्याने विद्यार्थिनींमध्ये उत्साहाचे वातावरण होते. या उपक्रमातून विद्यार्थिनींच्या सर्जनशीलतेला वाव मिळण्याबरोबरच देशप्रेमाची भावना अधिक दृढ झाली. यावेळी शिक्षक दिलीप पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. अध्यक्षीय भाषणात संस्थेचे सचिव संदीप घोरपडे यांनी रक्षाबंधनाच्या परंपरेविषयी विद्यार्थिनींना माहिती दिली. रक्षाबंधन महाभारत काळापासून साजरे केले जात असल्याचे सांगत त्यांनी रक्षाबंधन, सीमाबंधन आणि विवाहबंधन या शब्दांचे अर्थही विद्यार्थिनींना समजावून सांगितले. विद्यार्थिनींनी तयार केलेल्या सुंदर राख्यांचे त्यांनी कौतुक केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी दिलीप पाटील, मुकेश पाटील आणि दीपक महाजन यांनी परिश्रम घेतले. सूत्रसंचालन मुकेश पाटील यांनी केले, तर आभार दीपक महाजन यांनी मानले.

 

Author photo

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *