
उष्णतेचा कहर ; तालुक्यात चौघांचा मृत्यू, तर एकाची गळफास घेऊन आत्महत्या
अमळनेर (प्रतिनिधी) तालुक्यात वाढत्या उष्णतेमुळे चार जणांचा मृत्यू झाल्याच्या तर एका व्यक्तीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याच्या दुर्दैवी घटना घडल्या आहेत. वाढत्या उन्हात नागरिकांनी बाहेर पडू नये असे अहवान प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, तालुक्यातील एकतास येथील विश्वास नारायण पाटील (वय ४४) यांनी दुपारी शेतात काम करून भर उन्हातून घरी आल्यानंतर पाणी पिऊन कुलरसमोर बसले असता त्यांना अचानक झटका आला व उलट्या सुरू झाल्या. उपचारासाठी त्यांना ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, वैद्यकीय अधिकारी डॉ. जयेश शिंदे यांनी तपासून मृत घोषित केले. त्यांचा मृत्यू हृदयविकाराच्या झटक्याने झाला असावा, अशी शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. त्यांच्या पश्चात भाऊ, पत्नी व दोन मुले असा परिवार आहे. निमगूळ (ता. शिंदखेडा) येथील सिंधुबाई रमेश बागुल (वय ६९) या महिला भाच्याच्या मुलाच्या मेहंदी कार्यक्रमासाठी रेल्वेने अमळनेर येथे येत होत्या. सायंकाळी सव्वा सहाच्या सुमारास रेल्वे स्थानक परिसरात त्या बेशुद्ध अवस्थेत आढळून आल्याचे अधिकारी आर. बी. पाटील यांनी त्यांना रिक्षातून ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. वैद्यकीय अधिकारी डॉ. आशिष पाटील यांनी तपासून त्यांना मृत घोषित केले. महिलेला प्रचंड ताप असल्याने उष्णतेमुळे मृत्यू झाला असावा, अशी शक्यता वर्तविण्यात आली आहे. त्यांच्या पश्चात मुलगा, सून, मुलगी व नातवंडे असा परिवार आहे. दरम्यान, तालुक्यातील देवगाव देवळी येथील अनिल मंगल शिरसाठ (वय ३५) यांनी राहत्या घरी दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली. त्यांच्या पश्चात आई, पत्नी, एक मुलगा व तीन मुली असा परिवार आहे. तसेच एलआयसी कॉलनीतील रहिवासी रमेश जगन्नाथ चौधरी हे उन्हात लग्न समारंभाला गेल्यानंतर आजारी पडले होते. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. तर ढेकू येथील शंकर आनंदा पाटील यांचाही उष्णतेमुळे मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले.

Leave a Reply