
पालिका घनकचरा व्यवस्थापनातील ठेकेदाराने कामगारांचा पीएफच भरला नसल्याचे उघड
कामगारांनी भविष्य निर्वाह निधी आयुक्त यांच्याकडे केली तक्रार
अमळनेर (प्रतिनिधी) पालिकेतील घनकचरा व्यवस्थापनातील ठेकेदाराने २०२२ पासून कंत्राटी कामगारांचा भविष्य निर्वाह निधीच जमा केलेला नसल्याची प्रकार उघडकीस आला आहे. यासंदर्भात कामगारांनी भविष्य निर्वाह निधी आयुक्त यांच्याकडे निवेदनाद्वारे तक्रार केली आहे.
अमळनेर पालिकेचा घनकचरा व्यवस्थापन ठेका रामदास बाळू पवार ग्रीन वे एम्पायर याना देण्यात आला आहे. त्यांच्याकडे ६० कामगार काम करत आहेत. २०२२ पासून ठेकेदाराने भविष्य निर्वाह निधीच जमा केलेला नाही. याबाबत कामगारांनी २०२५ मध्ये तत्कालीन मुख्याधिकाऱ्यांना तक्रार केली होती. त्यावेळी मुख्याधिकाऱ्यांनी त्याला पीएफ देण्याचे आदेश दिले होते. मात्र ठेकेदाराने त्यांचेही आदेश जुमानले नाहीत. याबाबत कामगारांनी सांगितले की किमान वेतन कायद्याप्रमाणे वेतन देत नाही. ठेकेदाराचा पर्यवेक्षक खलील शहा हा साध्या वहीवर पेन्सिलीने पगार लिहून पेनाने सह्या घेतो. घंटा गाडी चालकाला ९ हजार रुपये आणि क्लिनर ला ७ हजार रुपये महिना पगार देतो. कामगारांनी तक्रार केल्यास कामावरून कमी करण्याच्या धमक्या देतो. वरिष्ठ अधिकारी चौकशीला आले असता प्रत्यक्ष पीएफ यादीत दुसऱ्यांची नावे आणि कामगार दुसरेच असल्याचाही आरोप होत आहे. आजपर्यंत अनेकवेळा तक्रारी करून तत्कालीन नगरसेवक ,लोकप्रतिनिधी आणि अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केले. निवेदनावर राहुल बिऱ्हाडे, योगेश चव्हाण, हेमंत नाईक, संदीप बैसाणे, अविनाश पाटील, शंकर मोरे, गोकुळ मोरे, फिरोज खाटीक, राजेश धाप, जगदीश संदानशीव, दीपक बिऱ्हाडे, दिनकर बिऱ्हाडे, संजय संदानशीव, संतोष बिऱ्हाडे, बबलू बिऱ्हाडे, राहुल बिऱ्हाडे, पवन बिऱ्हाडे यांच्या सह्या आहेत. निवेदनाच्या प्रति भविष्य निर्वाह निधी आयुक्त अनिलकुमार प्रीतम, सहाय्यक आयुक्त मोहित दीक्षित, सहाययक कामगार आयुक्त, जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक, मुख्याधिकारी यांना देण्यात आले आहे.
या आहेत कामगारांच्या मागण्या
गेल्या चार वर्षापासून भविष्य निर्वाह निधीची रक्कम थकबाकी व व्याजसह मिळावी, आयडी कार्ड असलेल्या कामगारांची नावे आणि पीएफ भरणा स्लिप मधील नावाची पडताळणी करण्यात यावी, आयुक्तांनी प्रत्यक्ष कामगारांना भेटून त्यांचे जबाब घेऊन चौकशी करावी, कामगारांना संरक्षण द्यावे, भ्रष्टाचार करणाऱ्या कंत्राटदारावर फौजदारी गुन्हे दाखल करावेत. कंत्राटदाराचे देयकातून कामगारांचा भविष्य निर्वाह निधी कापून घ्यावा आदी मागण्या निवेदनाद्वारे करण्यात आल्या आहेत.
कायदशीर कारवाई केली जाईल.
घनकचरा व्यवस्थापनात काम करणाऱ्या कामगारांचा पीएफ ठेकेदाराने कापलाच पाहिजे. याबाबत ठेकेदाराला नोटीस देऊन मुदत दिली जाईल. अन्यथा कायदेशीर कारवाई केली जाईल.
– गणेश शिंदे , मुख्याधिकारी अमळनेर नगरपरिषद

Leave a Reply