
अंतुर्ली-रंजाणे शिवारात अवैध मुरूम वाहतूक उघड; सहा लाखांचा मुद्देमाल जप्त
अमळनेर (प्रतिनिधी) तालुक्यातील अंतुर्ली–रंजाणे शिवारात मारवड पोलिसांनी रात्रीच्या गस्तीदरम्यान अवैधरीत्या मुरूम वाहतूक करणारा डंपर पकडून सुमारे सहा लाख सहा हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या कारवाईत चालकासह त्याच्या सहकाऱ्याला अटक करण्यात आली असून डंपर मालकाविरुद्धही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, ११ जुलै रोजी रात्री सुमारे ९ वाजण्याच्या सुमारास सहाय्यक पोलीस निरीक्षक साजिद मन्सुरी, सहाय्यक फौजदार फिरोज बागवान, हेड कॉन्स्टेबल संजय सूर्यवंशी, संजय पाटील, हेड कॉन्स्टेबल सुनील आगोणे आणि पोलीस कॉन्स्टेबल प्रवीण पाटील हे गस्त घालत असताना अंतुर्ली गावाजवळ रंजाणे शिवारातील ग्रीन पार्क हॉटेल परिसरात एमएच ३९ एडी २३४८ क्रमांकाचा डंपर मुरूम वाहतूक करताना आढळून आला.
पोलिसांनी डंपर चालक अंकुश अशोक सोनवणे (वय ३९) व त्याच्यासोबत असलेले नामदेव प्रल्हाद सोनवणे (वय ३८, दोघे रा. खापरखेडा) यांच्याकडे मुरूम वाहतुकीचा परवाना मागितला असता त्यांच्याकडे कोणताही वैध परवाना नसल्याचे निष्पन्न झाले. चौकशीत डंपर मालकाचे नाव शरद पुरुषोत्तम पाटील (रा. तासखेडा) असल्याचे चालकाने सांगितले.
या प्रकरणात पोलिसांनी सहा लाख रुपये किमतीचा डंपर आणि सहा हजार रुपये किमतीचा सुमारे चार ब्रास मुरूम असा एकूण सहा लाख सहा हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. चालक, त्याचा सहकारी आणि डंपर मालकाविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम ३०३(२), खाण व खनिज (विकास व विनियमन) अधिनियम, १९५७ चे कलम २१ तसेच महाराष्ट्र जमीन महसूल संहिता, १९६६ चे कलम ४८ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक फौजदार सुनील पाटील करीत आहेत. दरम्यान, चालक आणि त्याच्या सहकाऱ्याला अटक करण्यात आली असून डंपर मालकाला अटक करणे अद्याप बाकी आहे. याच पार्श्वभूमीवर तालुक्यातील निसर्डी येथेही आठ ते दहा ट्रॅक्टरद्वारे मोठ्या प्रमाणात अवैध गौण खनिज वाहतूक होत असल्याची माहिती उपविभागीय अधिकारी मयूर भंगाळे यांना मिळाली होती. त्यांच्या सूचनेनुसार पोलीस पथक घटनास्थळी रवाना झाले; मात्र पोलिसांच्या आगमनापूर्वीच ट्रॅक्टर चालकांनी तेथून पळ काढला. घटनास्थळी मुरूम उत्खननासाठी मोठे खड्डे करण्यात आल्याचे आढळून आल्याने या भागातील अवैध गौण खनिज उत्खनन व वाहतुकीचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे.

Leave a Reply