ज्येष्ठ नक्षत्र साधत चिमनपुरी–पिंपळे परिसरात कापूस लागवडीला वेग

अमळनेर (प्रतिनिधी) तालुक्यातील चिमनपुरी–पिंपळे परिसरात ज्येष्ठ नक्षत्राच्या शुभमुहूर्तावर कापूस लागवडीला वेग आला असून शेतकऱ्यांची शेततयारीसाठी धावपळ सुरू झाली आहे. कडक उन्हातही शेतकरी सकाळपासून संध्याकाळपर्यंत शेतात राबताना दिसत आहेत. उन्हाळी सुट्ट्यांमुळे विद्यार्थी आणि तरुण मंडळीही शेतकामात मदतीला उतरल्याने कामांना अधिक गती मिळत आहे.

परिसरातील ज्या विहिरींमध्ये पाण्याचा साठा उपलब्ध आहे, त्या शेतांमध्ये ठिबक सिंचन प्रणालीची जोडणी, नळ्या टाकणे, जमीन भुसभुशीत करणे आणि पेरणीपूर्व मशागतीची कामे युद्धपातळीवर सुरू आहेत. पाणी उपलब्ध असलेल्या शेतांमध्ये आधी लागवड पूर्ण करण्याला शेतकरी प्राधान्य देत आहेत. कापूस लागवड सुरू झाल्यानंतर पहिली औषधफवारणी, तण व्यवस्थापन आणि पीक संरक्षणाची तयारीही शेतकरी करीत आहेत. परिसरातील शेततळे आणि खोल विहिरींमधील पाणीसाठा मर्यादित असतानाही उपलब्ध पाण्याचा काटकसरीने वापर करून ज्येष्ठ नक्षत्रात पेरणी पूर्ण करण्यासाठी शेतकरी प्रयत्नशील असल्याचे चित्र दिसून येत आहे. उष्णतेचा पारा चाळीस अंशांच्या पुढे गेल्यानंतरही शेतकऱ्यांचा उत्साह कायम असून यंदा चांगल्या उत्पादनाच्या अपेक्षेने शेतकरी कापूस लागवडीत व्यस्त झाले आहेत.

Author photo

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *