
लोखंडी रॉड, सळई व साखळीने तरुणावर हल्ला; सहाजणांविरुद्ध गुन्हा
अमळनेर (प्रतिनिधी) तालुक्यातील मांडळ येथे किरकोळ कारणावरून एका तरुणाला सहाजणांनी घरात घुसून लोखंडी रॉड, सळई, काठी व साखळीने मारहाण केल्याची घटना २६ मे रोजी रात्री घडली. या प्रकरणी मारवड पोलिसांत सहाजणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की, फिर्यादी पंकज संजय कोळी (वय २५, रा. मांडळ) हे २६ मे रोजी रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास घरी जेवण करत असताना गावातील रायबा देवराम कोळी, साहेबराव देवराम कोळी, वगा देवराम कोळी, आकाश वगा कोळी, अमोल साहेबराव कोळी व गणेश अशोक कोळी (सर्व रा. मांडळ) हे एकत्रितपणे त्यांच्या घरी आले. त्यांनी कोणतेही कारण नसताना शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. शिवीगाळ का करता अशी विचारणा केली असता संबंधितांनी फिर्यादीला मारहाण करण्यास सुरुवात केली.
यावेळी रायबा कोळी याने लोखंडी रॉडने डोक्यावर वार केला. साहेबराव कोळी याने लोखंडी सळईने खांद्यावर मारून दुखापत केली. वगा कोळी व आकाश कोळी यांनी काठीने खांदा व पाठीवर मारहाण केली. अमोल कोळी याने साखळीने तोंडावर बुक्का मारून दुखापत केली, तर गणेश कोळी याने चापटाबुक्क्यांनी पोटावर मारहाण केली. दरम्यान, फिर्यादीचा भाऊ व वडील यांनी मध्यस्थी करत त्यांची सुटका केली. जखमी अवस्थेत उपचार घेतल्यानंतर पंकज कोळी यांनी मारवड पोलिसांत फिर्याद दाखल केली. पुढील तपास हेकॉ प्रवीण पारधी करीत आहेत.

Leave a Reply