वाडी संस्थानाला जयश्रीताई अनिल पाटील यांची भेट; आगीत झालेल्या नुकसानीची पाहणी, पुनर्बांधणीसाठी व्यक्त केला विश्वास

अमळनेर (प्रतिनिधी) श्री संत सखाराम महाराज वाडी संस्थान येथे लागलेल्या भीषण आगीत झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी अमळनेरच्या माजी नगराध्यक्षा  जयश्रीताई अनिल पाटील यांनी बुधवारी (२ जुलै) वाडी संस्थानाला भेट दिली. यावेळी त्यांनी मंदिर परिसराची प्रत्यक्ष पाहणी करून विश्वस्त मंडळाशी पुनर्बांधणीच्या कामाबाबत सविस्तर चर्चा केली.

यावेळी जयश्रीताई अनिल पाटील यांनी आगीत झालेल्या नुकसानीबद्दल तीव्र दुःख व्यक्त केले. श्री संत सखाराम महाराजांचे पावन मंदिर लवकरात लवकर पूर्ववत उभे राहावे, भाविकांना पुन्हा दर्शनाचा लाभ मिळावा आणि वाडी संस्थानचे आध्यात्मिक वैभव पूर्वीप्रमाणे तेजाने उजळून निघावे, अशी प्रार्थना त्यांनी श्री पांडुरंगाच्या चरणी केली. संकटाच्या या काळात श्रद्धा, विश्वास आणि सर्वांच्या एकजुटीच्या बळावर वाडी संस्थान पूर्वीपेक्षाही अधिक भव्य आणि दिव्य स्वरूपात उभे राहील, असा ठाम विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.

भेटीदरम्यान मंदिराच्या पुनर्बांधणीसाठी सुरू असलेल्या नियोजनाची माहिती त्यांनी विश्वस्तांकडून जाणून घेतली तसेच या कठीण प्रसंगी संस्थानच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याची भावना व्यक्त केली. श्री संत सखाराम महाराजांच्या मंदिराचे वैभव पुन्हा पूर्ववत करण्यासाठी समाजातील सर्व घटकांनी एकत्र येण्याची गरज असल्याचेही त्यांनी यावेळी नमूद केले.

 

Author photo

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *