
गहू खरेदीत मोठा घोटाळा उघड; मंगरूळच्या आर. के. फूड्स कंपनीला बाजार समितीने ठोकले सील
अमळनेर (प्रतिनिधी) शेतकऱ्यांकडून गहू खरेदी करताना वजनात मोठ्या प्रमाणात तफावत आढळून आल्याने तालुक्यातील मंगरूळ एमआयडीसीमधील आर. के. फूड्स कंपनीवर कृषी उत्पन्न बाजार समितीने कारवाई करत कंपनीला सील ठोकले आहे. या प्रकारामुळे शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणात फसवणूक होत असल्याचा आरोप होत असून तालुक्यात संतापाची लाट पसरली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, तालुक्यातील सोनखेडी येथील दीपक देविदास पाटील यांनी आपला गहू विक्रीसाठी मंगरूळ एमआयडीसीतील आर. के. फूड्स कंपनीत आणला होता. त्यांच्या गव्हाचे प्रत्यक्षात ५० ते ५५ क्विंटल वजन अपेक्षित असताना कंपनीच्या काट्यावर वजन केल्यावर केवळ ४१ क्विंटल वजन भरल्याचे दिसून आले. त्याचप्रमाणे गंगापुरी येथील रवींद्र विठ्ठल पाटील यांच्या गव्हाच्याही वजनात मोठी तफावत आढळली.
वजनातील हा फरक लक्षात येताच संतप्त शेतकऱ्यांनी धुळे रस्त्यावर रस्ता रोको आंदोलन केले. काही काळ वाहतूक ठप्प झाली होती. घटनेची माहिती मिळताच कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अशोक पाटील, संचालक शरद पाटील, वृषभ पारख, प्रकाश वाणी, सचिव डॉ. उन्मेष राठोड यांच्यासह संदीप पाटील, सुनील पाटील, योगेश महाजन, डिगंबर पाटील तसेच पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम, हेडकॉन्स्टेबल काशिनाथ पाटील, सागर साळुंखे, प्रशांत पाटील, सिद्धांत शिसोदे व पोलीस पाटील भागवत पाटील घटनास्थळी दाखल झाले.
वाहतूक सुरळीत केल्यानंतर सर्वांच्या उपस्थितीत आर. के. फूड्स कंपनीच्या काट्यावर पुन्हा वजन करून पाहण्यात आले. त्यावेळी २०० क्विंटल गव्हाचे वजन केवळ ९० क्विंटल भरले, तर १०० क्विंटल गव्हाचे वजन फक्त ४० क्विंटल भरल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले. एवढ्या मोठ्या प्रमाणातील तफावत पाहून उपस्थित शेतकरी व नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला. या प्रकारामुळे शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणावर लूट होत असल्याची चर्चा तालुकाभर पसरली आहे.
विशेष म्हणजे वजन-माप निरीक्षकांनी १३ जानेवारी रोजीच या कंपनीचा वजन काटा तपासून ‘पास’ केल्याचेही समोर आले आहे. त्यामुळे या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी होत आहे.
याबाबत बाजार समितीचे सभापती अशोक पाटील यांनी सांगितले की, हे प्रकरण वांधा समितीसमोर ठेवण्यात येणार असून संबंधित कंपनीविरुद्ध कायदेशीर कारवाई केली जाईल. तसेच शेतकऱ्यांना झालेल्या नुकसानीची भरपाई देण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील. आतापर्यंत किती शेतकऱ्यांची फसवणूक झाली आहे याचीही सखोल चौकशी करण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

Leave a Reply