अमळनेरमध्ये घर जमीनदोस्त करून उजळ माथ्याने फिरणाऱ्या आरोपींना तात्काळ अटक करून सीआयडी चौकशी करा

राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) चे जळगाव जिल्हा उपाध्यक्ष प्रा. अशोक पवार यांची जोरदार मागणी

 

अमळनेर (प्रतिनिधी) अमळनेर येथील न्यू प्लॉट परिसरातील देशमुख चाळीत 10 फेब्रुवारी 2026 रोजी शरद शिंदे यांचे राहते घर जेसीबीच्या सहाय्याने जमीनदोस्त केल्याच्या घटनेने शहरात संतापाची लाट उसळली आहे. या प्रकरणी सरजू गोकलानी, महेश देशमुख व संबंधित गावगुंडांवर तात्काळ अटक करून कारवाई करावी तसेच संपूर्ण प्रकरणाची सीआयडीमार्फत चौकशी करावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) चे जळगाव जिल्हा उपाध्यक्ष प्रा. अशोक पवार यांनी केली आहे.

प्रा. पवार यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, संबंधित आरोपी अजूनही मोकाट फिरत असून त्यांच्यावर अद्याप कठोर कारवाई झालेली नाही. अमळनेर पोलीस ठाण्याकडून फिर्याद नोंदविण्यास 24 तासांचा विलंब करण्यात आला. तसेच फिर्यादीवर समझोत्यासाठी दबाव आणण्यात आला. त्यामुळे या प्रकरणाचा तपास स्थानिक पोलिसांकडून काढून घेऊन सीआयडीकडे सोपवावा, अशी मागणी करण्यात आली आहे. देशमुख चाळीत सुमारे 20 भाडेकरू राहत असून त्यामध्ये नयन शरद शिंदे व योगेश रमेश पवार हे केंद्रीय राखीव पोलीस दलात कार्यरत आहेत. देशसेवेसाठी तत्पर असलेल्या जवानांच्या कुटुंबियांनाही अमळनेरात सुरक्षितता नसल्याची खंत व्यक्त करण्यात आली. ही घटना साने गुरुजींची कर्मभूमी असलेल्या अमळनेरच्या प्रतिमेला धक्का देणारी आहे. धनदांडग्यांकडून पोलिसांच्या कथित सहकार्याने गरीबांना बेघर करण्याचे प्रकार वाढत असल्याने महिला व गरिबांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. अनेक कुटुंबे घरे सोडून अन्यत्र स्थलांतर करण्याच्या तयारीत आहेत.

या घटनेची गंभीर दखल आमदार अनिल भाईदास पाटील व खासदार स्मिताताई वाघ यांनी घ्यावी आणि गुंडगिरीला आळा घालावा, अशी मागणी नागरिकांच्या वतीने करण्यात आली आहे. अमळनेरच्या इतिहासात प्रथमच अशी गंभीर घटना घडली आहे.  नागरिकांनी आगामी आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहनही करण्यात आले आहे. तसेच, बिल्डरांच्या दबावामुळे ज्यांच्या जागा ताब्यात घेतल्या गेल्या आहेत, त्यांनी प्रा. अशोक पवार यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे. या प्रकरणी भाडेकरू व सामाजिक कार्यकर्ते उच्च न्यायालय खंडपीठ औरंगाबाद, मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य, पोलीस महासंचालक, डीआयजी नाशिक परिक्षेत्र, महसूल आयुक्त नाशिक, जिल्हाधिकारी जळगाव व डीवायएसपी अमळनेर यांची भेट घेऊन कारवाईची मागणी करणार असल्याचे प्रा. पवार यांनी म्हटले आहे.

Author photo

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *