
अमळनेर पंचायत समितीतर्फे दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी विशेष फिजिओथेरपी शिबिर
अमळनेर (प्रतिनिधी) पंचायत समितीच्या समग्र शिक्षा अंतर्गत तालुक्यातील दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी विशेष फिजिओथेरपी व आरोग्य तपासणी शिबिर झाले. लोकमान्य शाळेच्या परिसरात पार पडलेल्या या शिबिरात तालुक्यातील अनेक गरजू दिव्यांग विद्यार्थी व त्यांच्या पालकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.
शिबिराचे उद्घाटन गटविकास अधिकारी एन. आर. पाटील यांच्या हस्ते झाले. यावेळी गटशिक्षणाधिकारी प्रमोद पाटील तसेच शिक्षण विस्तार अधिकारी रावसाहेब पाटील यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करताना दिव्यांग विद्यार्थ्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी आणि त्यांच्या शारीरिक हालचाली सुलभ करण्यासाठी समावेशित शिक्षण विभाग सातत्याने कार्यरत असल्याचे सांगितले. अशा प्रकारच्या उपचारांमुळे विद्यार्थ्यांच्या शारीरिक विकासाला मोठी मदत होत असल्याचे त्यांनी नमूद केले. शिबिरात अमळनेर येथील तज्ज्ञ फिजिओथेरपिस्ट डॉ. रितिक भरत कोठारी, चाहत रितिक कोठारी व त्यांच्या टीमने विद्यार्थ्यांची सखोल तपासणी केली. मेंदूचा पक्षाघात तसेच इतर शारीरिक अडचणी असलेल्या मुलांना विविध व्यायाम पद्धती समजावून सांगण्यात आल्या. याशिवाय पालकांना घरच्या घरी घ्यावयाची काळजी व उपचार पद्धतींबाबतही मार्गदर्शन करण्यात आले.
शिबिरासाठी लोकमान्य शाळेच्या मुख्याध्यापकांनी मोलाचे सहकार्य केले. तसेच तालुक्यातील सर्व केंद्रप्रमुखांनी आपल्या केंद्रातील दिव्यांग विद्यार्थ्यांना या शिबिराचा लाभ मिळवून देण्यासाठी विशेष प्रयत्न केले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी समावेशित शिक्षण विभागातील केंद्रस्तरीय विशेष शिक्षकांनी महत्त्वाची भूमिका बजावली. विद्यार्थ्यांची नोंदणी, उपचारासाठी मदत आणि पालकांच्या शंकांचे निरसन या सर्व बाबींमध्ये त्यांचा सक्रिय सहभाग राहिला. या शिबिरामुळे ग्रामीण भागातील दिव्यांग विद्यार्थ्यांना एकाच ठिकाणी तज्ज्ञांचे मार्गदर्शन मिळाल्याने पालकांनी समाधान व्यक्त केले.

Leave a Reply