अमळगावात २४ वर्षीय विवाहिता पाच वर्षीय मुलासह बेपत्ता; मारवड पोलिसांत तक्रार

अमळनेर (प्रतिनिधी)  तालुक्यातील अमळगाव येथे शेतीच्या कामासाठी आलेल्या कुटुंबातील २४ वर्षीय विवाहिता आपल्या पाच वर्षीय मुलासह बेपत्ता झाल्याची घटना समोर आली असून, याप्रकरणी मारवड पोलिस ठाण्यात बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल करण्यात आली आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की, घोडगाव (ता. चोपडा) येथील हे कुटुंब शेतमजुरीसाठी अमळगाव येथे वास्तव्यास आले होते. बेपत्ता महिलेच्या पतीने दिलेल्या फिर्यादीनुसार, २९ रोजी दुपारी सुमारे १ वाजता तो कामावरून झोपडीत परतला असता पत्नी व मुलगा तेथे आढळून आले नाहीत. याबाबत शेजारी राहणाऱ्या महिलेला विचारणा केली असता, संबंधित विवाहिता आपल्या मुलासह एका अनोळखी दुचाकीस्वारासोबत गेल्याचे तिने सांगितले.

महिलेचा मोबाईलही बंद लागत असल्याने नातेवाईक तसेच परिसरात सर्वत्र शोध घेण्यात आला. मात्र, त्यांचा कोणताही ठावठिकाणा लागला नाही. अखेर पतीने मारवड पोलिस ठाण्यात बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली असून, पुढील तपास सहाय्यक फौजदार संजय पाटील करीत आहेत.

 

Author photo

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *