अमळनेरचे दोन्ही बेपत्ता बालक ठाणे येथे सुखरूप सापडले; रेल्वे पोलिसांनी दिले पालकांच्या ताब्यात

अमळनेर (प्रतिनिधी) शहरातून एकाच वेळी बेपत्ता झालेली दोन्ही अल्पवयीन मुले अखेर ठाणे येथे सुखरूप सापडली असून रेल्वे पोलिसांनी दिनांक १ रोजी त्यांना त्यांच्या पालकांच्या ताब्यात सुपूर्द केले आहे. या घटनेमुळे कुटुंबीयांमध्ये निर्माण झालेली चिंता अखेर दूर झाली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, प्रतीक विकास पाटील (वय १४ वर्षे, रा. सुरभी कॉलनी) व हर्ष दत्तप्रसाद बडगुजर (वय १४ वर्षे, रा. युनियन बँकेमागे, अमळनेर) ही दोन्ही मुले दिनांक २८ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ०६:३० वाजल्यापासून घरातून निघून गेली होती. रात्री उशिरापर्यंत घरी परत न आल्याने पालकांनी शोधाशोध सुरू केली होती. नातेवाईक, मित्रपरिवार तसेच विविध ठिकाणी चौकशी करूनही काहीच ठावठिकाणा लागत नसल्याने चिंता वाढली होती. दरम्यान, ही दोन्ही मुले ठाणे रेल्वे स्थानक येथे रेल्वे पोलिसांच्या निदर्शनास आली. संशय आल्याने पोलिसांनी त्यांची चौकशी केली असता ती अमळनेर येथील असल्याचे समोर आले. त्यानंतर संबंधित पालकांशी संपर्क साधून त्यांना ठाणे येथे बोलावण्यात आले व आवश्यक खातरजमा केल्यानंतर मुलांना त्यांच्या ताब्यात देण्यात आले. प्राथमिक माहितीनुसार, अमळनेर रेल्वे स्थानकावरून ही मुले मेमो गाडीने भुसावळ येथे पोहोचली होती. तेथे काही वेळ फलाटावर फिरल्यानंतर रात्री मुंबईकडे जाणाऱ्या रेल्वेत बसून पहाटे ठाणे येथे उतरल्याची माहिती समोर आली आहे. मात्र त्यांनी घर का सोडले याबाबत ठोस कारण अद्याप समजू शकलेले नाही.

सुदैवाने रेल्वे पोलिसांच्या सतर्कतेमुळे दोन्ही बालके सुरक्षित सापडल्याने पालकांनी समाधान व्यक्त केले आहे. या घटनेनंतर पालकांनी आपल्या मुलांवर लक्ष ठेवण्याची आणि त्यांच्याशी संवाद वाढवण्याची गरज व्यक्त होत आहे.

 

Author photo

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *