
जानवे गावातील गटारी कचऱ्याने तुडुंब; सांडपाण्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात
अमळनेर (प्रतिनिधी) तालुक्यातील जानवे गावातील गटारी घाणीने व प्लास्टिक कचऱ्याने पूर्णपणे तुडुंब भरल्याचे धक्कादायक चित्र समोर आले आहे. गटारीतील सांडपाणी रस्त्यावर साचल्याने परिसरात दुर्गंधी पसरली असून नागरिकांच्या आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.
गटारीत मोठ्या प्रमाणावर प्लास्टिक पिशव्या, बाटल्या तसेच इतर कचरा टाकण्यात आल्यामुळे पाण्याचा नैसर्गिक प्रवाह पूर्णपणे बंद झाला आहे. परिणामी सांडपाणी साचून राहिल्याने अस्वच्छतेचे साम्राज्य निर्माण झाले आहे. या परिस्थितीमुळे डासांची उत्पत्ती वाढत असून डेंग्यू, मलेरिया आणि इतर साथीच्या रोगांचा धोका निर्माण झाला आहे. स्थानिक नागरिकांनी अनेक वेळा संबंधित प्रशासनाकडे तक्रारी केल्याचा दावा केला असला तरी अद्याप कोणतीही ठोस कारवाई करण्यात आलेली नसल्याची नाराजी व्यक्त होत आहे. विशेषतः पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर ही समस्या अधिक गंभीर होण्याची शक्यता असल्याने ग्रामस्थांमध्ये चिंता वाढली आहे. दरम्यान, नागरिकांनी तातडीने गटारींची साफसफाई करून नियमित कचरा व्यवस्थापनाची प्रभावी व्यवस्था करण्याची मागणी केली आहे. अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही ग्रामस्थांनी दिला आहे.

Leave a Reply