
अमळनेर येथे ‘समाजभूषण सन्मान’ उपक्रमाचा मंगल शुभारंभ
महामहोपाध्याय श्रीधर शास्त्री जयंतीनिमित्त प्रसाद महाराजांच्या शुभहस्ते उद्घाटन
अमळनेर (प्रतिनिधी ) “द्विजवार्ता” आणि “द्विज” यांच्यातील सुसंवादातून सुवार्ता घडते आणि ती जनमानसात रुजते, या पवित्र प्रेरणेतून आज अमळनेर येथील वाडी संस्थानात ‘समाजभूषण सन्मान’ उपक्रमाचा थाटामाटात शुभारंभ करण्यात आला.
द्विजवार्ता आणि महामहोपाध्याय श्रीधर शास्त्री पाठक सेवा समिती यांच्या संयुक्त विद्यमाने हा सोहळा आयोजित करण्यात आला. समाजाभिमुख, समाजसेवा, आध्यात्मिक व धार्मिक कार्य अधिक व्यापक आणि द्विगुणित व्हावे, या उदात्त हेतूने ह.भ.प.प.पू. प्रसाद महाराज यांच्या शुभहस्ते ‘समाजभूषण सन्मान’ ट्रॉफीचे उद्घाटन करण्यात आले. या मंगल प्रसंगी सद्गुरु सखाराम महाराज यांचे आशीर्वाद लाभले.
महामहोपाध्याय श्रीधर शास्त्री पाठक यांचा जन्म १३ फेब्रुवारी १८७८ रोजी पारोळा येथे झाला. त्यांनी धुळे येथील सरस्वती पाठशाळा, धुळे या वेदशास्त्र शिक्षण संस्थेची स्थापना करून अध्यात्म व संस्कारांचा दीप प्रज्वलित केला. २३ मार्च १९६० रोजी त्यांचे निर्वाण झाले; मात्र त्यांच्या कार्याचा तेजोमय वारसा आजही समाजाला प्रेरणा देत आहे. १७ जानेवारी १९९७ रोजी धुळे येथील पाठशाळेत श्रीधर शास्त्री स्वामींच्या पुतळ्याचे अनावरण श्री किशोरजी व्यास यांच्या हस्ते करण्यात आले होते. त्या वेळी मुल्हेरकर महाराज आणि परमपूज्य प्रसाद महाराज यांची आशीर्वादपूर्वक उपस्थिती लाभली होती. आज त्यांच्या जयंतीदिनी त्यांच्याच शुभहस्ते ‘समाजभूषण सन्मान’ उपक्रमाचा प्रारंभ होणे, ही भक्तांसाठी भावनिक आणि ऐतिहासिक क्षण ठरला. वेदशास्त्री केशव पुराणीक गुरुजी यांनी त्यांच्या लहानपणापासूनच्या आठवणी, संन्यासस्वीकार आणि कठोर शिस्त यांचे प्रेरणादायी वर्णन केले. श्री संजय शास्त्री पाठक यांनीही काकांच्या स्मृतींना उजाळा दिला.
या सोहळ्यास सुनील जोशी, सखाराम वैद्य (चोपडा), अभियंता मनोहर रामचंद्र पाठक, अनिल जोशी, उदय देशपांडे, वेदमूर्ती सुनिल मांडे, गणेश वैद्य व अनिता वैद्य, प्राचार्य विनय वैद्य, श्री सारंग पाठक गुरुजी, श्री महेश कुलकर्णी, रमेश जोशी, कल्पना वैद्य, मंगल जानवे, जितेंद्र जोशी तसेच असंख्य भक्तगण उपस्थित होते.
या ऐतिहासिक सोहळ्यात सद्गुरु सखाराम महाराजांनी जाहीर केले की, पुढील काळात वाडी संस्थानात दरवर्षी महाशिवरात्रीच्या पावन पर्वावर तीन महान मान्यवरांना सन्मानचिन्ह व विशेष पारितोषिक प्रदान करण्यात येईल. श्री पाठक, श्री पुराणिक आणि द्विजवार्ता परिवार हा उपक्रम सातत्याने साजरा करतील, असेही त्यांनी नमूद केले.
या कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी धनेश पाठक व प्रसाद जोशी (संपादक, द्विजवार्ता) यांनी विशेष परिश्रम घेतले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन धनेश पाठक यांनी केले. प्रास्ताविकात अनिल पाठक यांनी शास्त्रीजींच्या जीवनकार्याचा ओघवता आढावा घेतला.

Leave a Reply