
पहाटेच्या गुप्त कारवाईत अवैध वाळू वाहतुकीवर धडक; ४६ लाख ६६ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त
उपविभागीय अधिकारी मयूर भंगाळे यांची खाजगी वाहनातून छापेमारी; दोन डंपर चालकांविरुद्ध गुन्हे

अमळनेर (प्रतिनिधी) खबऱ्यांना आणि सहकारी कर्मचाऱ्यांनाही थांगपत्ता लागू न देता अमळनेरचे उपविभागीय अधिकारी मयूर भंगाळे यांनी रविवारी (दि. १५) पहाटे दोन वाजता खाजगी वाहनातून चोपडा तालुक्यात धडक कारवाई केली. यावल रोड आणि गरताड शिवारात टाकलेल्या छाप्यांमध्ये दोन डंपर व सुमारे २७.५ ब्रास वाळू असा एकूण ४६ लाख ६६ हजार ३२५ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून दोन डंपर चालकांविरुद्ध चोपडा पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
याबाबत अधिक माहिती अशी की, वाळूचे अधिकृत ठेके बंद झाल्यानंतरही परिसरात अवैध वाळू वाहतूक सुरू असल्याची माहिती उपविभागीय अधिकारी मयूर भंगाळे यांना मिळाली होती. यापूर्वी शासकीय वाहनाने किंवा नियमित पद्धतीने छापे टाकण्यापूर्वी माहिती बाहेर जात असल्याने अनेक कारवाया निष्फळ ठरत होत्या. त्यामुळे यावेळी भंगाळे यांनी पूर्ण गोपनीयता राखत शासकीय वाहन घरीच ठेवले आणि खाजगी वाहनातून कारवाई करण्याचा निर्णय घेतला. मंडळाधिकारी गौरव शिरसाठ तसेच ग्राम महसूल अधिकारी जितेंद्र पाटील आणि अमोल पाटील यांना केवळ रात्रीच्या गस्तीवर जाणार असल्याचे सांगून त्यांनी अचानक चोपडा तालुक्याकडे मोर्चा वळवला. यावल रोडवरील बडगुजर पेट्रोल पंपाजवळ डंपर क्रमांक जी.जे. ०७ व्ही.डब्ल्यू. ७९३५ हा सुमारे अडीच ब्रास वाळूची वाहतूक करताना आढळून आला. डंपर अडविल्यानंतर पोलीस निरीक्षक पवन देसले तसेच महसूल कर्मचारी संजय सैतवाल, जगदीश कापडे आणि विनोद भालेराव यांना घटनास्थळी पाचारण करण्यात आले. पंचनामा करून वाहन चालक मनोज कैलास कोळी यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम ३०३(२), महसूल अधिनियम कलम ४८(७), ४८(८)(१), ४८(८)(२) तसेच मोटार वाहन कायदा कलम १८४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. या कारवाईत २० लाख रुपयांचा डंपर आणि ६० हजार ५७५ रुपयांची वाळू जप्त करण्यात आली. या प्रकरणाचा तपास जगदीश पाटील करीत आहेत. यानंतर मयूर भंगाळे आणि त्यांच्या पथकाने पहाटे अडीच वाजेच्या सुमारास गरताड रस्त्यावर दुसरी धडक कारवाई केली. संजय पाटील आणि संजय अग्रवाल यांच्या गट क्रमांक २२७/२ मधील मिक्सर प्लॉटवर डंपर क्रमांक एम.एच. ३२ क्यू २९४ उभा असल्याचे आढळून आले. त्यामध्ये काही प्रमाणात वाळू होती, तर परिसरात सुमारे २५ ब्रास वाळूचा साठा आढळून आला. स्थानिक पोलीस आणि महसूल अधिकाऱ्यांना बोलावून पंचनामा करण्यात आला. संबंधित डंपर चालकाविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून २० लाख रुपयांचा डंपर आणि ६ लाख ५ हजार ७५० रुपयांची वाळू असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास हेडकॉन्स्टेबल ज्ञानेश्वर जवागे करीत आहेत.
“विनापरवाना, अवैध गौण खनिज वाहतुकीवर कारवाई करणार
“विनापरवाना , अवैध गौण खनिज वाहतुकीवर कठोर कारवाई करण्यात येईल. महसूल कर्मचाऱ्यांनी आपापल्या क्षेत्रात लक्ष ठेवावे तसेच जप्त केलेल्या वाहनांची तक्रार आर टी ओ विभागाकडे देखील करण्यात येणार आहे.”
–मयूर भंगाळे, उपविभागीय अधिकारी, अमळनेर

Leave a Reply