
निम येथे आंतरराष्ट्रीय गुर्जर दिवस व सम्राट मिहीर भोज जयंती उत्साहात
समाजबांधवांचा उत्स्फूर्त सहभाग; शिक्षण, एकता आणि सामाजिक प्रगतीचा संदेश

अमळनेर (प्रतिनिधी) : पाडळसरेजवळील निम येथे आंतरराष्ट्रीय गुर्जर दिवस तथा गुर्जर-प्रतिहार सम्राट मिहीर भोज जयंती मोठ्या उत्साहात आणि जल्लोषपूर्ण वातावरणात साजरी करण्यात आली. यावेळी गुर्जर समाजबांधव मोठ्या संख्येने एकत्र आले होते.
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान दोडे गुर्जर संस्थानचे विश्वस्त डॉ. एल. डी. चौधरी यांनी भूषविले. त्यांच्या हस्ते गुर्जर सम्राट राजा मिहीर भोज यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आला. उपस्थित मान्यवर व समाजबांधवांनी सम्राट मिहीर भोज यांच्या शौर्य, पराक्रम, नेतृत्वगुण आणि ऐतिहासिक कार्याचे स्मरण करून त्यांना अभिवादन केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन गुर्जर मंडळाचे आयोजक तथा आदर्श शिक्षक अक्षय चौधरी यांनी केले.
यावेळी प्रमुख पाहुणे सरकारी वकील तथा ग्रामपंचायत सदस्य अॅड. राजेंद्र चौधरी, माजी सरपंच भास्कर चौधरी आणि डॉ. एल. डी. चौधरी यांनी मनोगत व्यक्त केले. सम्राट मिहीर भोज यांचा इतिहास हा शौर्य, स्वाभिमान आणि पराक्रमाची प्रेरणादायी गाथा असल्याचे त्यांनी सांगितले.
“केवळ इतिहासाचा अभिमान बाळगण्यापेक्षा त्या इतिहासातून प्रेरणा घेऊन शिक्षण, सामाजिक एकता, संस्कार आणि प्रगतीला प्राधान्य दिले पाहिजे,” असा संदेश यावेळी देण्यात आला. युवकांनी शिक्षणाच्या माध्यमातून प्रगती साधावी तसेच समाजाच्या उज्ज्वल भविष्यासाठी एकजुटीने कार्य करावे, असे आवाहनही करण्यात आले.
“इतिहासाचा अभिमान मनात, एकतेची ताकद हातात आणि शिक्षणाची साथ घेऊन समाजाला प्रगतीच्या दिशेने घेऊन जाणे हीच सम्राट मिहीर भोज यांना खरी आदरांजली ठरेल,” असा सूर उपस्थित वक्त्यांच्या मनोगतातून उमटला.
कार्यक्रमादरम्यान “जय सम्राट मिहीर भोज”, “जय वीर गुर्जर” अशा घोषणांनी परिसर दुमदुमून गेला. समाजातील युवकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतल्याने कार्यक्रमाला विशेष उत्साहाचे स्वरूप प्राप्त झाले.
यावेळी निम गावातील गुर्जर समाजबांधव, युवक, ज्येष्ठ नागरिक, महिला तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. समाजातील एकता अधिक मजबूत करण्यासोबतच युवकांना शिक्षण, संस्कार आणि सामाजिक कार्यासाठी प्रोत्साहन देण्याचा संकल्प उपस्थितांनी केला.
उत्साहपूर्ण आणि मंगलमय वातावरणात कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

Leave a Reply