दुष्काळाच्या सावटात बळीराजाच्या बैलराजाला साज-शृंगाराची अनोखी भेट!

अमळनेर (प्रतिनिधी) ‘आपण गावाचे देणे लागतो’ या सद्भावनेतून सालाबादाप्रमाणे यंदाही पोळा सणानिमित्त ढेकू सिम येथील लोकनियुक्त सरपंच सुरेखा प्रविण पाटील यांच्या वतीने संपूर्ण गावातील बैलराजाच्या साज-शृंगारासाठी आवश्यक साहित्याचे वाटप करण्यात आले. पावसाने दडी मारल्याने शेतीचा हंगाम हातचा जाण्याची चिंता असताना आणि कोरड्या दुष्काळाचे सावट निर्माण झालेले असताना शेतकरी राजाच्या सुख-दुःखातील साथीदार असलेल्या बैलराजाप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी राबविण्यात आलेला हा उपक्रम शेतकऱ्यांसाठी दिलासादायक ठरला.

बैलपोळा म्हटला की बळीराजाच्या सख्याचा, म्हणजेच बैलाचा सन्मान. या सणानिमित्त बैलांना सजविण्यासाठी लागणारे दोन मोख्या, पोमगोंडा, फुलांची व रंगीत डवी, गळ्यातील माळ, शिंगांना बांधण्यासाठी लागणारी दोरी तसेच शेतकरी राजाच्या सन्मानासाठी गोंधा टोपी व उपरणे अशा साहित्याचा समावेश असलेल्या एकूण ७५ किटचे वाटप सुरेखा प्रविण पाटील यांच्या सौजन्याने करण्यात आले. साहित्य मिळाल्याने शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले. अमळनेर तालुक्यात पावसाने दडी मारल्याने शेतीचा हंगाम धोक्यात आला असून कोरड्या दुष्काळाचे सावट निर्माण झाले आहे. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांच्या डोळ्यांत चिंता असताना पोळा सणाच्या माध्यमातून बैलराजाप्रती कृतज्ञता व्यक्त करता यावी आणि हा पारंपरिक सण उत्साहात साजरा करता यावा, यासाठी करण्यात आलेल्या मदतीचे शेतकरी बांधवांनी स्वागत केले. या साहित्य वाटप कार्यक्रमासाठी गावातील ज्येष्ठ नागरिक मधुकर पाटील, शांताराम पाटील, चंद्रकांत पाटील, दिलीप पाटील, विलास पाटील, जीवन पाटील यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य नामदेव पाटील, समाधान गायकवाड, भूषण पाटील, बेबाबाई पाटील, मंगल पाटील, सीमा पाटील, सुरेखा भिल, मनीषा सोनवणे, पप्पू पाटील तसेच तरुण मित्र परिवार मोठ्या संख्येने उपस्थित होता. कार्यक्रमाच्या शेवटी गावातील सर्व शेतकरी बांधवांनी लोकनियुक्त सरपंच सुरेखा प्रविण पाटील यांचे आभार मानले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उपसरपंच जाधवराव पाटील यांनी केले.

 

Author photo

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *