
एलआयसी कॉलनीत महिलांसाठी पतंजली योग समितीचा मोफत योगवर्ग सुरू
अमळनेर (प्रतिनिधी) शहरातील प्रभाग क्रमांक ८ मधील एलआयसी कॉलनी भूखंडावर महिला पतंजली योग समितीच्या वतीने महिलांसाठी दररोज मोफत योगवर्ग सुरू करण्यात आला आहे. महिलांचे शारीरिक व मानसिक आरोग्य सुदृढ राहावे, तसेच विविध आजारांपासून बचाव व्हावा या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात येत असून परिसरातील महिलांकडून त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.
सध्याच्या धकाधकीच्या जीवनशैलीमुळे महिलांमध्ये कर्करोग, हृदयविकार, सांधेदुखी, थायरॉईड आदी आजारांचे प्रमाण वाढत आहे. घर आणि नोकरीच्या जबाबदाऱ्यांमुळे अनेक महिलांना नियमित व्यायाम किंवा सकाळी चालण्याचा वेळ मिळत नाही. ही बाब लक्षात घेऊन महिला पतंजली योग समितीने हा मोफत योगवर्ग सुरू केला आहे. पतंजली योग समितीच्या अमळनेर तहसील प्रभारी कामिनी पवार, कोषाध्यक्ष रत्ना भदाणे, मीडिया प्रभारी माधुरी पाटील आणि अलका पाटील या दररोज सकाळी सव्वा पाच ते सव्वा सहा या वेळेत महिलांना योगाचे मार्गदर्शन करीत आहेत. योगासनांसह प्राणायाम आणि आरोग्यविषयक मार्गदर्शनही या वर्गात दिले जात आहे. या उपक्रमासाठी नगरसेविका अपूर्वा चौधरी आणि जालंदर चौधरी यांनी एलआयसी कॉलनीतील योगवर्गासाठी दोन योग मॅट उपलब्ध करून दिल्या आहेत. तसेच पतंजली योग समिती आणि एलआयसी कॉलनीच्या रहिवाशांचेही या उपक्रमाला सहकार्य लाभत आहे. सध्या परिसरातील ३५ महिला या मोफत योगवर्गाचा नियमित लाभ घेत असून महिलांमध्ये आरोग्याबाबत जनजागृती निर्माण करण्यासाठी हा उपक्रम प्रभावी ठरत असल्याची भावना आयोजकांनी व्यक्त केली आहे.

Leave a Reply