पॅरा ऑलिम्पिक पॉवर लिफ्टिंग महापौर चषकात दिनेश बागडेने १७० किलो बेंच प्रेससह ‘स्ट्रॉंग मॅन’ किताब पटकवला

अमळनेर (प्रतिनिधी) अमळनेरच्या क्रीडा क्षेत्रासाठी अभिमानाची बाब ठरावी अशी कामगिरी करत दिनेश शशी बागडे याने मुंबईतील बोरिवली येथे झालेल्या पाचव्या पॅरा ऑलिम्पिक पॉवर लिफ्टिंग महापौर चषक स्पर्धेत विजेतेपद पटकावले. १०७ किलो वजनी गटात तब्बल १७० किलो बेंच प्रेस उचलत त्याने महापौर चषकावर नाव कोरले. एवढ्यावरच न थांबता स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट खेळाडू म्हणून ‘बेस्ट लिफ्टर’ आणि प्रतिष्ठेचा ‘स्ट्रॉंग मॅन’ किताबही आपल्या नावावर केला.

पॅरा ऑलिम्पिक पॉवर लिफ्टिंग असोसिएशन, मुंबई यांच्या वतीने २८ जून रोजी बोरिवली येथे पाचव्या महापौर चषक स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. राज्यातील विविध भागांतून सहभागी झालेल्या खेळाडूंमध्ये दिनेश बागडे याने दमदार कामगिरी करत आपल्या ताकदीचा ठसा उमटविला. १०७ किलो वजनी गटात १७० किलो वजन यशस्वीरीत्या उचलून त्याने सुवर्ण यश संपादन केले. त्यानंतर सर्व गटांतील कामगिरीचा विचार करून त्याची स्पर्धेतील ‘बेस्ट लिफ्टर’ म्हणून निवड करण्यात आली आणि त्याला ‘स्ट्रॉंग मॅन’ पदकाने गौरविण्यात आले. दिनेश बागडे याने यापूर्वीही राष्ट्रीय व राज्यस्तरावर उल्लेखनीय कामगिरी केली आहे. त्याने दोन वेळा ‘खेलो इंडिया’ स्पर्धेत पदक, चार वेळा राष्ट्रीय स्पर्धेत पदक, सहा वेळा राज्यस्तरीय स्पर्धेत पदक मिळविले आहे. तसेच ओपन पॉवर लिफ्टिंग स्पर्धांमध्येही सहा वेळा ‘बेस्ट लिफ्टर स्ट्रॉंग मॅन’ हा बहुमान मिळवून आपल्या सातत्यपूर्ण गुणवत्तेची प्रचिती दिली आहे. मुंबईत मिळालेल्या या दैदिप्यमान यशामुळे अमळनेरच्या क्रीडाविश्वात आनंदाचे वातावरण असून विविध स्तरांतून दिनेश बागडे याचे अभिनंदन होत आहे. त्याच्या या यशामुळे तालुक्यातील युवा खेळाडूंना प्रेरणा मिळणार असल्याची भावना व्यक्त होत आहे.

 

Author photo

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *