श्री मंगळग्रह मंदिर परिसरात संतश्री सखाराम महाराज रोपवाटिका झाली नव्याने विकसित

विकसित केलेल्या विविध विभागांसह निसर्ग बैठक स्थळाची संतश्री प. पू. प्रसाद महाराजांकडून पाहणी

अमळनेर (प्रतिनिधी )येथील मंगळग्रह सेवा संस्था संचलित ख्यातकीर्त श्री मंगळग्रह मंदिर परिसरात नव्याने विकसित करण्यात आलेल्या संत श्री सखाराम महाराज रोपवाटिकेस शुक्रवार, दि. 26 जून रोजी सायंकाळी संतश्री सखाराम महाराज वाडी संस्थानाचे गादिपती प. पू. प्रसाद महाराज यांनी सदिच्छा भेट दिली. यावेळी त्यांनी रोपवाटिकेची पाहणी केली. तसेच रोपवाटिकेत तयार करण्यात आलेले स्वतंत्र विविध विभाग, परिसरातील सुशोभीकरण, पर्यावरण संवर्धनासाठी करण्यात आलेले प्रयत्न आणि भाविकांसाठी निर्माण करण्यात आलेल्या सोयी-सुविधांबद्दल कौतुक करत मंगळग्रह सेवा संस्थेच्या या उपक्रमास भरभरून शुभेच्छा देत कृपाशीर्वादही दिला.

 मंगळग्रह सेवा संस्थेचे अध्यक्ष डॉ. डिगंबर महाले यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच संस्थेचे ग्रीनरी कन्स्लंटट श्री. सुबोध पाटील यांच्या सहकार्याने गेल्या 20 वर्षांपासून या रोपवाटिकेचे संगोपन केले जात होतेच. मात्र, रोपवाटिकेत विविध विभाग तयार करून ती अधिकाधिक भव्य-दिव्य स्वरूपात विकसित करावी, या उद्देशातून नुकतेच या रोपवाटिकेचे व्यापक नूतनीकरण करण्यात आले आहे. रोपवाटिकेमध्ये विविध प्रकारच्या औषधी वनस्पती, फुलझाडे, शोभिवंत वृक्ष, फळझाडे तसेच पर्यावरण संवर्धनाला चालना देणारे विविध विभाग विकसित करण्यात आले असून, भाविकांना निसर्गाच्या सान्निध्यात अध्यात्माचा अनुभव घेता यावा, या उद्देशाने परिसराचे आकर्षक नियोजन करण्यात आले आहे.

संतश्री प. पू. प्रसाद महाराज यांनी रोपवाटिकेतील विविध विभागांची पाहणी करून त्यामागील संकल्पना जाणून घेतली. मंदिर परिसरातील हरित उपक्रम, स्वच्छता आणि पर्यावरणपूरक विकासाबाबत त्यांनी समाधान व्यक्त केले. भविष्यातही अशा उपक्रमांमुळे समाजामध्ये पर्यावरण संरक्षणाचा संदेश अधिक प्रभावीपणे पोहोचेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

तत्पूर्वी, संतश्री प. पू. प्रसाद महाराज यांनी श्री मंगळग्रह मंदिरात जाऊन श्री मंगळग्रह देवांचे दर्शन घेतले. त्यानंतर त्यांचे मंगळग्रह सेवा संस्थेचे सचिव सुरेश बाविस्कर, सहसचिव दिलीप बहिरम, खजिनदार गिरीश कुलकर्णी यांच्या हस्ते पाद्यपूजन करण्यात येऊन यथोचित स्वागत करण्यात आले. मंदिराचे पुरोहित शुभम वैष्णव, हेमंत गोसावी, पवन शर्मा यांनी पौरोहित्य केले. यावेळी संत श्री सखाराम महाराज वाडी संस्थानातील सुदाम पाटील महाराज, हर्षल जोशी महाराज, सारंग पाठक, मंगल सेवेकरी आर. टी. पाटील, ए. डी. भदाणे यांच्यासह मंदिराचे सेवेकरी आणि भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

रोपवाटिकेतील विविध विभाग

 

संत श्री सखाराम महाराज रोपवाटिकेच्या नूतनीकरणात विविध विभाग नव्याने तयार केले आहेत. त्यामध्ये गांडूळ खत प्रकल्प, गोवरी, प्लास्टिक क्रशिंग, गुलाब बाग, वृक्षारोपण, जैविक खतप्रणाली आदी विभागांसह रोपवाटिकेशेजारीच भाविकांना निसर्ग सान्निध्याचा मनमुराद आनंद घेता यावा, या उद्देशातून निसर्ग बैठक स्थळही तयार करण्यात आले असून, हे स्थळ विविध वृक्षराजीने सज्ज झालेले आहे.

 

Author photo

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *