
कुस्ती मल्लविद्या महासंघाच्या अमळनेर तालुकाध्यक्षपदी पैलवान प्रताप शिंपी यांची निवड
अमळनेर (प्रतिनिधी) : सामाजिक, क्रीडा आणि संघटनात्मक क्षेत्रातील योगदानाची दखल घेत पै. प्रताप अशोक शिंपी (आबा) यांची महाराष्ट्र राज्य कुस्ती मल्लविद्या महासंघाच्या अमळनेर तालुकाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. त्यांच्या निवडीमुळे अमळनेर तालुक्यातील कुस्तीप्रेमी, खेळाडू आणि क्रीडा क्षेत्रातील मान्यवरांकडून त्यांचे अभिनंदन होत आहे.
पै. प्रताप अशोक शिंपी (आबा) हे अमळनेर शहरातील सामाजिक व क्रीडा क्षेत्रात सक्रिय व्यक्तिमत्त्व म्हणून परिचित आहेत. त्यांनी नगरसेवक म्हणूनही कार्य केले असून, जय हिंद व्यायामशाळा, अमळनेरचे अध्यक्ष म्हणून क्रीडा क्षेत्रासाठी योगदान दिले आहे. तसेच राजे शिवाजी मित्र मंडळाचे अध्यक्ष म्हणून सामाजिक, सांस्कृतिक आणि सार्वजनिक उपक्रमांमध्ये त्यांचा सक्रिय सहभाग राहिला आहे. कुस्ती हा महाराष्ट्राच्या मातीत रुजलेला पारंपरिक क्रीडा प्रकार असून, या खेळाला प्रोत्साहन देण्यासाठी व्यायामशाळा, आखाडे, कुस्ती स्पर्धा तसेच नवोदित मल्लांना आवश्यक व्यासपीठ उपलब्ध करून देण्यावर तालुकाध्यक्ष म्हणून भर देणार असल्याचे पै. प्रताप अशोक शिंपी (आबा) यांनी सांगितले. तालुक्यातील मल्लांच्या अडचणी समजून घेऊन त्यांना मार्गदर्शन, प्रशिक्षण आणि प्रोत्साहन मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील राहणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. त्यांच्या नेतृत्वाखाली अमळनेर तालुक्यात कुस्ती मल्लविद्येला अधिक बळ मिळेल, तसेच ग्रामीण भागातील होतकरू मल्लांना स्पर्धांच्या माध्यमातून आपले कौशल्य दाखविण्याच्या अधिक संधी उपलब्ध होतील, अशी अपेक्षा क्रीडाप्रेमींकडून व्यक्त होत आहे. पै. प्रताप अशोक शिंपी (आबा) यांच्या निवडीबद्दल कुस्ती मल्लविद्या महासंघाचे पदाधिकारी, क्रीडाप्रेमी, व्यायामशाळेतील मल्ल, मित्रपरिवार आणि नागरिकांनी त्यांचे अभिनंदन करून पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

Leave a Reply