
रक्तदानातून माणुसकीचा संदेश; विश्व बंधुत्व दिनी अमळनेरात रक्तदान शिबिर
अमळनेर (प्रतिनिधी) : राजयोगिनी दादी प्रकाशमणी यांच्या १९व्या पुण्यतिथीनिमित्त आणि विश्व बंधुत्व दिवसाचे औचित्य साधून प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्वरीय विश्व विद्यालय, अमळनेर यांच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. मानवतेची सेवा आणि सामाजिक बांधिलकीचा संदेश देणाऱ्या या उपक्रमाला रक्तदात्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
यावेळी ओम शांती केंद्राच्या रंजू दीदी, वैष्णवी दीदी, सुषमा पाटील, अविनाश पाटील आणि ज्ञानेश्वर पाटील यांच्यासह अनेकांनी रक्तदान केले. रक्तदान करणाऱ्या रक्तदात्यांना यावेळी प्रमाणपत्र देण्यात आले. केंद्र प्रमुख विद्यादीदी यांनी रक्तदानाचे महत्त्व सांगताना प्रत्येक व्यक्तीने रक्तदान केले पाहिजे, असे आवाहन केले. रक्तदानामुळे शरीरातील रक्ताभिसरणास मदत होते आणि शरीर निरोगी ठेवण्यास हातभार लागतो. सर्वात महत्त्वाचे म्हणजे आपल्या रक्तामुळे एखाद्या गरजू व्यक्तीला जीवदान मिळू शकते. त्यामुळे रक्तदान हे श्रेष्ठ दान असून, त्यातून माणसे जोडली जातात, असे त्यांनी सांगितले.
यावेळी केंद्र प्रमुख विद्यादीदी, अॅड. तिलोत्तमा पाटील आणि ब्लड बँकेचे संचालक जितेंद्र पाटील उपस्थित होते. रक्तदान शिबिराच्या माध्यमातून गरजू रुग्णांसाठी रक्त उपलब्ध करून देण्यासोबतच समाजात रक्तदानाबाबत जनजागृती करण्यात आली. रक्तदान शिबिर यशस्वी करण्यासाठी दिलीप पाटील, आरती दीदी आणि हरचंद लांडगे यांनी सहकार्य केले. विश्व बंधुत्व दिवसाच्या निमित्ताने झालेल्या या उपक्रमातून सेवा, माणुसकी आणि सामाजिक एकतेचा संदेश देण्यात आला.

Leave a Reply