वादळी वाऱ्यामुळे अमळनेर तालुक्यात पिकांचे मोठे नुकसान

पंचनामा करून तातडीने मदत जाहीर करण्याची शेतकऱ्यांची मागणी

 

अमळनेर (प्रतिनिधी) तालुक्यातील पळासदडे परिसरात दि. 19 मार्च रोजी अचानक आलेल्या जोरदार वादळी वाऱ्यामुळे शेती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. पंचनामा करून तातडीने मदत जाहीर करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

या वादळामुळे अनेक शेतकऱ्यांच्या शेतातील मका, हरभरा, ज्वारी, कांदा व बाजरी ही पिके आडवी पडली असून काही ठिकाणी पिके पूर्णपणे नष्ट झाली आहेत. सध्या काढणीच्या टप्प्यावर असलेल्या पिकांना या वादळी वाऱ्याचा मोठा फटका बसला आहे. अनेक शेतकऱ्यांनी मोठा खर्च करून पिके उभी केली होती. मात्र अचानक आलेल्या वादळामुळे शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले असून त्यांच्या समोर मोठे संकट उभे राहिले आहे. या पार्श्वभूमीवर महसूल व कृषी विभागाने तातडीने नुकसानग्रस्त शेतीची पाहणी करून पंचनामे करण्याचे आदेश द्यावेत, तसेच नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना शासनाकडून तात्काळ आर्थिक मदत जाहीर करावी, अशी जोरदार मागणी पळासदडे परिसरातील शेतकरी वर्गातून होत आहे. स्थानिक शेतकऱ्यांनी सांगितले की, जर प्रशासनाने लवकरात लवकर पंचनामे करून मदत जाहीर केली नाही तर आधीच आर्थिक अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांची परिस्थिती आणखी बिकट होण्याची शक्यता आहे. म्हणून शासनाने या नुकसानीची तातडीने दखल घेऊन शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

 

या गावांमध्येही पिकांचे सर्वाधिक नुकसान

 

चिमनपुरी पिंपळे खु, पिंपळे बु, आटाले वाघोदा, शिरसाळे, आर्डी, परिसरात नुकसान अधिक आहे. सोसाट्याचा वारा व हलक्या हलक्या सरी पावसामुळे बाजरी, ज्वारी, मका, गहु, दादरला फटका बसला. वाऱ्याच्या तीव्रतेमुळे उभी पिके आडवी झाली. रब्बी हंगामातील मका कापणीच्या अंतिम टण्यात आला होता. मका कापणीसाठी मजूर उपलब्ध होत नसल्याने अनेक शेतकऱ्यांचा मका व गहू शेतात उभा होता. काही ठिकाणी गव्हाची कापणी पूर्ण झाली असली तरी मळणीचे काम सुरू असताना अचानक झालेल्या हलक्या स्वरूपाचा पावसामुळे कापलेला गहू, मका, ज्वारी भिजला. त्यामुळे मका व गहू खराब होण्याची शक्यता आहे. परिणामी उत्पादन घटण्याची भीती निर्माण झाली आहे. त्यामुळे चिंता वाढली आहे.

 

शासनाने आर्थिक मदत द्यावी

 

गहू, मका ज्वारी दादर आणि इतर पिकांची स्थिती चांगली होती. अचानक झालेल्या वादळी वाऱ्यामुळे व हलके स्वरूपाचे पावसामुळे सगळे गणित बिघडले आहे. अनेक ठिकाणी पिके आडवी पडली आहे. वेळेवरती मजूर मिळत नसल्यामुळे   कापणी वेळेत करता येत नाही आणि दुसरीकडे अधूनमधून पडणाऱ्या जोराचा वारा व पावसामुळे पीक भिजून खराब होते आहे. शासनाने तात्काळ पंचनामे करून आर्थिक मदत द्यावी.

युवराज पाटील शेतकरी, पिंपळे ( सामाजिक कार्यकर्ते) 

 

Author photo

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *