अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर ‘भूमी सुपोषण अभियान’चा आज मासिक सांगता सोहळा

अमळनेर (प्रतिनिधी) शेतजमिनीचा पोत सुधारून सुजलाम्-सुफलाम् शेतीसाठी सुरू करण्यात आलेल्या ‘भूमी सुपोषण अभियान’ या राष्ट्रीय चळवळीच्या जनजागराला एक महिना पूर्ण होत असून, त्यानिमित्त मासिक सांगता सोहळा उद्या, रविवार दि. १९ एप्रिल रोजी अक्षय्य तृतीयेच्या पवित्र मुहूर्तावर आयोजित करण्यात आला आहे.

श्री मंगळग्रह मंदिर परिसरात सकाळी ८ वाजता होणाऱ्या या कार्यक्रमाचे आयोजन अक्षय कृषी परिवार आणि मंगळग्रह सेवा संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले आहे. वर्ष प्रतिपदा अर्थात गुढीपाडव्याच्या औचित्याने दि. १९ मार्च २०२६ रोजी विविध मंत्री आणि शेतकऱ्यांच्या उपस्थितीत या अभियानाचा शुभारंभ करण्यात आला होता. या सांगता सोहळ्यास प्रांताधिकारी मयूर भंगाळे, तहसीलदार रूपेशकुमार सुराणा, डीवायएसपी विनायक कोते, नगरपालिकेचे मुख्याधिकारी गणेश शिंदे, उपविभागीय कृषी अधिकारी साठे, तालुका कृषी अधिकारी ठाकरे यांच्यासह तालुक्यातील कृषी क्षेत्रातील पुरस्कारप्राप्त मान्यवर सतीश निंबाजी काटे (कोळपिंप्री), भाऊगीर धुडकूगीर गोसावी (नगाव), सौ. पुष्पलता साहेबराव पाटील (राजवड), सुरेश पिरन पाटील, श्रीमती राजश्री राजेश पाटील उपस्थित राहणार आहेत.

यावेळी विशेष भूमिपूजन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून, तालुक्यातील तसेच विविध गावांतील शेतकऱ्यांनी आपल्या शेतातील एक मूठ माती सोबत आणण्याचे आवाहन करण्यात आले आहे. ही माती एकत्र करून तिचे विधिवत पूजन करण्यात येणार असून, त्यानंतर अभिमंत्रित माती पुन्हा शेतात टाकण्याची परंपरा राबविण्यात येणार आहे. भूमी सुपोषणाचा संदेश अधिक व्यापक करण्यासाठी या अभियानात अधिकाधिक शेतकऱ्यांनी सहभागी व्हावे आणि इतरांनाही सहभागी करून घ्यावे, असे आवाहन मंगळग्रह सेवा संस्था, अमळनेर यांच्या वतीने करण्यात आले आहे.

 

Author photo

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *