
धार येथील जि. प. मराठी शाळा ‘कलारंग’ वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात
अमळनेर (प्रतिनिधी) तालुक्यातील धार येथील जिल्हा परिषद मराठी शाळेत सन २०२६ चे वार्षिक स्नेहसंमेलन ‘कलारंग’ अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात झाले.
कार्यक्रमाच्या प्रारंभी लेझीमच्या तालावर प्रमुख पाहुणे व मान्यवरांचे पारंपरिक पद्धतीने भव्य स्वागत करण्यात आले.
या सोहळ्याचे उद्घाटन अमळनेरचे गटविकास अधिकारी एन. आर. पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी केंद्रप्रमुख किरण शिसोदे (अंतुर्ली), केंद्रप्रमुख चंद्रकांत साळुंखे (अमळगाव), ग्रामसेवक वासुदेव मारवडकर तसेच शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष रवींद्र पाटील आदी मान्यवर उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन व प्रतिमा पूजन करून कार्यक्रमाची मंगलमय सुरुवात करण्यात आली.
या प्रसंगी विद्यार्थ्यांनी नृत्य, गीत, नाटिका तसेच विविध सांस्कृतिक सादरीकरणांद्वारे आपल्या कलागुणांची आकर्षक झलक सादर केली. विद्यार्थ्यांच्या या उत्कृष्ट सादरीकरणाने उपस्थितांची मने जिंकली. धार ग्रामस्थांनी विद्यार्थ्यांच्या या कौशल्याचे कौतुक करत त्यांना रोख स्वरूपात भरघोस बक्षिसे देऊन प्रोत्साहित केले.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी जमाल दादा (साऊंड सिस्टिम) आणि किशोर दादा (मंडप व्यवस्था) यांनी मोलाचे सहकार्य केले. यावेळी शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य, गावातील ज्येष्ठ नागरिक, आजी-माजी विद्यार्थी, पालक तसेच माता-भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. मुख्याध्यापिका नयना शिंदे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करून आभार मानले. शितल पाटील यांनी प्रास्ताविक करून उपस्थित मान्यवरांचा सत्कार केला.

Leave a Reply