
परवानगीशिवाय निर्णयांना बंदी; खा.शि. मंडळावर धर्मादाय आयुक्तांचे निर्बंध
अमळनेर (प्रतिनिधी) खान्देश शिक्षण मंडळाच्या कार्यकारिणीवर धर्मादाय आयुक्तांनी कडक निर्बंध घातले असून, आयुक्तांच्या पूर्वपरवानगीशिवाय कोणतेही धोरणात्मक निर्णय किंवा आर्थिक व्यवहार करू नयेत, असे स्पष्ट निर्देश देण्यात आले आहेत. याबाबत शिक्षण विभागालाही कळविण्यात आले आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, मंडळाच्या २०२५-२८ या कालावधीसाठी निवडलेल्या नव्या कार्यकारिणीचा चेंज रिपोर्ट चिटणीस प्रा. पराग पाटील यांनी धर्मादाय आयुक्तांकडे सादर केला होता. मात्र, या निवडणुकीवर माजी संचालक दिलीप जैन यांनी हरकत घेत निवडणूक बेकायदेशीर असल्याचा आरोप केला. न्यायालयीन प्रक्रिया प्रलंबित असताना धर्मादाय आयुक्त वा त्यांच्या प्रतिनिधींच्या अनुपस्थितीत निवडणूक घेऊन निकाल जाहीर केल्याचा मुद्दाही उपस्थित करण्यात आला आहे.
दरम्यान, सादर केलेला चेंज रिपोर्ट रद्द का करू नये, याबाबत संचालक, मुख्याध्यापक, शिक्षक प्रतिनिधी, चिटणीस आणि प्राचार्यांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. तसेच पुढील आदेश येईपर्यंत कोणतेही महत्त्वाचे निर्णय न घेण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
या पार्श्वभूमीवर प्रकरण न्यायालयात प्रलंबित असताना मंडळाच्या कारभारावर अनिश्चिततेचे सावट निर्माण झाले आहे. दरम्यान, धर्मादाय आयुक्तांच्या आदेशाची प्रत अद्याप संस्थेला मिळालेली नसून, ती मिळाल्यानंतर पुढील निर्णय घेण्यात येईल, अशी माहिती चिटणीस प्रा. पराग पाटील यांनी दिली.

Leave a Reply