
वाडी संस्थानातील आगीप्रकरणी पोलिसांत तक्रार; पाच ते सहा कोटींच्या सागवानासह साहित्य जळाल्याची नोंद
अमळनेर (प्रतिनिधी) अमळनेर येथील श्री संत सखाराम महाराज वाडी संस्थानाला लागलेल्या भीषण आगीत मुख्य गाभाऱ्यातील सुमारे पाच ते सहा कोटी रुपयांचे सागवान लाकूड तसेच इतर साहित्य जळून खाक झाल्याची तक्रार अमळनेर पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक शरद काकळीज करीत आहेत.
याबाबत वाडी संस्थानचे अनिकेत देव यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, १ जुलै रोजी रात्री ८ वाजून १५ मिनिटांच्या सुमारास ते वाडी संस्थानाबाहेर उभे असताना मुख्य गाभाऱ्यातून धूर येत असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यांनी तत्काळ आत जाऊन पाहिले असता सभामंडपातील इलेक्ट्रिक वायरिंगजवळ शॉर्टसर्किट होऊन सतरंजीवर ठिणग्या पडत असल्याचे दिसून आले. घटनेनंतर अतुल कुलकर्णी, कुणाल भावसार, अनिल जाधव, सूरजसिंग परदेशी आणि प्रमोद जाधव यांनी तातडीने आग विझविण्याचा प्रयत्न केला. मात्र आगीने रौद्ररूप धारण केल्याने अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले.
अग्निशमन दलाच्या अथक प्रयत्नांनंतर सुमारे दोन ते तीन तासांनी आग आटोक्यात आली. मात्र तोपर्यंत मुख्य गाभाऱ्यातील मौल्यवान सागवान लाकूड तसेच इतर साहित्य जळून मोठे नुकसान झाले होते. या घटनेप्रकरणी अमळनेर पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली असून, आगीचे नेमके कारण आणि नुकसानाची सविस्तर चौकशी सुरू आहे.
अतिशय मन हेलावून टाकणारी घटना
“ही अतिशय मन हेलावून टाकणारी घटना आहे. ही बातमी समजताच मनाला मोठा धक्का बसला. मात्र आम्हा सर्वांचा पांडुरंगावर आणि सद्गुरूंच्या कृपेवर अढळ विश्वास आहे. प. पू. प्रसाद महाराज पायी वारी पूर्ण करून अमळनेरला परत येईपर्यंत मंदिराच्या दुरुस्तीचे काम पूर्णत्वास जाईल, असा दृढ विश्वास आहे. ही केवळ वास्तू नाही, तर असंख्य भाविकांच्या श्रद्धेचे आणि भक्तीचे केंद्र आहे. या संकटातूनही भक्तांच्या एकजुटीने आणि पांडुरंगाच्या कृपेने मंदिर पूर्ववत उभे राहील. सर्वांनी धैर्य राखून श्रद्धा आणि सेवाभाव कायम ठेवावा, हीच अपेक्षा.”
– मोहन बेलापूरकर महाराज, संत सखाराम महाराज यांचे शिष्य, बेलापूरकर संस्थान

Leave a Reply