ग्राइंडर मशीन हातातून सटकल्याने सुताराचा दुर्दैवी मृत्यू; टाकरखेड्यातील दुर्घटनेने हळहळ

अमळनेर (प्रतिनिधी) तालुक्यातील टाकरखेडा येथे ग्राइंडर मशीन हातातून सटकून गळा व कपाळाजवळ गंभीर दुखापत झाल्याने एका ज्येष्ठ सुतार कारागिराचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना बुधवारी (२ जुलै) दुपारी सुमारे १२ वाजण्याच्या सुमारास घडली. या अपघातात देविदास लटकन सुतार (वय ७४, रा. टाकरखेडा) यांचा रक्तस्राव होऊन जागीच मृत्यू झाला. या घटनेमुळे टाकरखेडा परिसरात शोककळा पसरली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की,  देविदास लटकन सुतार हे परिसरातील अनुभवी व कुशल सुतार म्हणून परिचित होते. फर्निचर तयार करण्याबरोबरच मंदिरांमधील आकर्षक लाकडी नक्षीकामासाठी त्यांची विशेष ओळख होती. अनेक वर्षांपासून ते आपल्या कौशल्याच्या बळावर उत्कृष्ट कलाकुसरीची कामे करत होते. नेहमीप्रमाणे बुधवारी सकाळी ते टाकरखेडा–जळगाव रस्त्यालगत असलेल्या आपल्या पत्र्याच्या शेडमधील कार्यशाळेत कामासाठी गेले होते. काम सुरू करण्यासाठी त्यांनी एका हातात ग्राइंडर मशीन धरून ते सुरू करण्याचा प्रयत्न केला. मात्र, अचानक मशीन त्यांच्या हातातून सटकले आणि फिरत्या ब्लेडचा जोरदार फटका त्यांच्या मानेच्या वरच्या भागात व कपाळाजवळ बसला. या अपघातात त्यांना अत्यंत गंभीर जखम झाली.

जखम खोल असल्याने मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाला आणि त्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. या दुर्घटनेमुळे गावात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. देविदास लटकन सुतार यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, दोन सुना, एक मुलगी आणि नातवंडे असा मोठा परिवार आहे. मेहनती, शांत स्वभावाचे आणि उत्कृष्ट कारागीर म्हणून ओळख असलेल्या देविदास सुतार यांच्या अकाली निधनाने टाकरखेडा परिसरात शोक व्यक्त केला जात आहे.

 

Author photo

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *