
अमळनेरमधील संजय कृषी केंद्राचा खत विक्री परवाना कायमस्वरूपी रद्द
तपासणीत अनेक त्रुटी आढळल्या; कृषी विभागाची कारवाई
(प्रतिनिधी) शहरातील संजय कृषी केंद्रावर कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी केलेल्या तपासणीत विविध गंभीर त्रुटी आढळून आल्याने संबंधित दुकानाचा खत विक्री परवाना कायमस्वरूपी रद्द करण्यात आला आहे. परवाना अधिकारी तथा कृषी अधीक्षक कु. मु. तडवी यांनी ही कारवाई केली.
याबाबत अधिक माहितीनुसार, २५ मार्च रोजी जिल्हा गुणवत्ता नियंत्रण अधिकारी व कृषी विकास अधिकाऱ्यांनी अमळनेर येथील संजय कृषी केंद्रावर छापा टाकून तपासणी केली होती. तपासणीदरम्यान दुकानाच्या साठवणूक स्थळी नोंदणी प्रमाणपत्र दर्शनी भागात लावलेले नसल्याचे आढळले. तसेच भावफलक नसणे, खत साठा रजिस्टर विहित नमुन्यात न ठेवणे, विक्रीची बिले उपलब्ध नसणे तसेच बिलांवर शेतकऱ्यांच्या सह्या नसणे अशा अनेक त्रुटी निदर्शनास आल्या. याशिवाय खतांचा प्रत्यक्ष साठा आणि नोंदीतील साठा यामध्ये तफावत आढळली. नियमित अहवाल पाठवले जात नसल्याचेही समोर आले. दुकानात वजन काटा उपलब्ध नसणे तसेच पॉस मशीनवरील साठा आणि प्रत्यक्ष साठ्यात फरक असल्याचे तपासणीत स्पष्ट झाले. या प्रकारामुळे अमळनेर पोलिस ठाण्यात संबंधितांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर दुकानदाराला १७ एप्रिल रोजी सुनावणीसाठी बोलावून खुलासा मागविण्यात आला. मात्र संबंधित व्यापाऱ्याने दिलेला खुलासा मोघम व असमाधानकारक असल्याचे कृषी विभागाने नमूद केले आहे. ही बाब खत नियंत्रण आदेश १९८५ मधील कलम ४, ५, ७, ८, १९, २४, २५, २६, ३५(१)(अ), ३५(३) आणि ३७ चे उल्लंघन करणारी असल्याचे निष्पन्न झाल्याने कु. मु. तडवी यांनी कलम ३१(१)(२) अंतर्गत अधिकाराचा वापर करून संजय कृषी केंद्राचा खत विक्री परवाना कायमस्वरूपी रद्द केला. दरम्यान, दुकान मालक श्रेणीक संजय जैन यांना विभागीय कृषी सहसंचालक यांच्याकडे एका महिन्याच्या आत अपील करण्याची संधी देण्यात आली असून त्यांनी अपील दाखल केल्याचे सांगितले आहे.

Leave a Reply