पुढील सर्व निवडणुका सोप्या करायच्या असतील तर मतदारयादी पुनरीक्षण मोहिमेकडे लक्ष द्या – आ. अनिल पाटील

राष्ट्रवादी काँग्रेसचा बूथ कार्यकर्ता मेळावा उत्साहात; SIR मोहिमेला भविष्यातील निवडणुकांचे ‘राजकीय थर्मामीटर’ संबोधत कार्यकर्त्यांना सज्ज राहण्याचे आवाहन

 

अमळनेर (प्रतिनिधी )“आपल्याला पुढील सर्व निवडणुका सोप्या करायच्या असतील तर मतदार यादी विशेष संक्षिप्त पुनरीक्षण मोहीम (SIR) वर काळजीपूर्वक लक्ष द्या. या मोहिमेतून तयार होणाऱ्या मतदार याद्या म्हणजे पुढील 20 ते 25 वर्षांची सोय असून त्यासाठी आतापासूनच चौकस राहा,” असे आवाहन माजी मंत्री तथा आमदार अनिल भाईदास पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या बूथ कार्यकर्ता मेळाव्या प्रसंगी केले.

बन्सीलाल पॅलेस, अमळनेर येथे ही बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी शहर व ग्रामीण भागातील बूथ कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. सुरुवातीला राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष संजय पवार यांनी मार्गदर्शन करून विशेष संक्षिप्त पुनरीक्षण मोहिमेसाठी सर्वांनी सज्ज व्हावे, असे आवाहन केले.

पुढे बोलताना आमदार पाटील म्हणाले की, निवडणूक आयोग दर काही वर्षांनी मतदार यादी अपडेट करण्यासाठी विशेष मोहीम राबवतो. त्याला SIR म्हणतात. यामध्ये 18 वर्षे पूर्ण झालेल्यांची नावे यादीत वाढवणे, मृत व्यक्ती, स्थलांतरित झालेले मतदार काढून टाकणे, नाव, पत्ता, फोटो, वय यात चूक असेल तर दुरुस्त करणे यांचा समावेश असतो. यासाठी BLO म्हणजे Booth Level Officer घरोघरी जाऊन माहिती तपासतात. थोडक्यात SIR म्हणजे मतदार यादीची विशेष साफसफाई आणि अपडेट मोहीम आहे.

बूथ कार्यकर्त्यांनी एक लक्षात ठेवावे की “माझं बूथ प्लस” म्हणजे माझा आणि पक्षाचा विजय आहे. बूथच्या यशस्वी कार्यकर्त्याचीच पक्षात नोंद घेतली जात असते. आपल्या बूथवर मिळालेले मतदान म्हणजेच राजकारणातील थर्मामीटर असून मतदार यादी ही राजकीय भवितव्याचा आत्मा असल्याने ती किती सक्षम करायची हे बूथ कार्यकर्त्यांच्या हाती आहे.

पालिका निवडणुकीत आपल्याला अपयश आले, पण हरकत नाही; आपल्याला आपल्या चुका कळल्या आहेत. त्या दुरुस्त करण्याची संधी आपल्याकडे आहे. SIR मोहीम देखील आपल्यासाठी संधी असून मतदार यादीचे अवलोकन करून आपल्या भागातील बीएलओ बरोबर संपर्क वाढवा. येणाऱ्या काळात मॅपिंगद्वारे दुबार नावे कोणत्याही परिस्थितीत वगळली जातील. जवळपास 32 हजार नावे मतदारसंघातून कमी होऊ शकतील. त्यासाठी बूथ रचना पक्की करा, असे आवाहन त्यांनी केले.

यासोबतच येणाऱ्या काळात बूथ कार्यकर्त्याला थेट एन्ट्री हे धोरण उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार अवलंबविणार असल्याचेही त्यांनी आवर्जून सांगितले.

सुरुवातीला प्रास्ताविक माजी नगरसेवक विक्रांत पाटील यांनी केले. तर जिल्हा प्रवक्ते योगेश देसले व तालुकाध्यक्ष भागवत पाटील यांनी मनोगत व्यक्त केले.

मंचावर माजी नगराध्यक्षा सौ. जयश्री अनिल पाटील, जेष्ठ नेत्या सौ. तिलोत्तमा पाटील, शहराध्यक्ष मुक्तार खाटीक, नूतन शहराध्यक्ष चेतन राजपूत, मार्केट सभापती अशोक आधार पाटील, जितुभाऊ ठाकूर, महिला अध्यक्ष मंदाकिनी भामरे, युवक शहराध्यक्ष पंकज साळी, युवक ग्रामीण अध्यक्ष तारकेश्वर गांगुर्डे यांसह मान्यवर उपस्थित होते. सूत्रसंचालन विनोद कदम सर यांनी केले तर आभार सुनील काटे यांनी मानले.

मेळाव्यास बाजार समितीचे सर्व आजी-माजी संचालक, माजी जिल्हा परिषद व पंचायत समितीचे पदाधिकारी, आजी-माजी नगरसेवक, सरपंच, सोसायटी चेअरमन, कार्यकर्ते, पदाधिकारी, बूथ प्रमुख व बूथ सदस्य, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व फ्रंटल पदाधिकारी, शाखा अध्यक्ष व शाखा पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Author photo

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *