
अमळनेरात १४ मे रोजी “स्वराज्य रक्षक छत्रपती शंभू राजे” महानाट्याचे होणार सादरीकरण
संस्कृती फाऊंडेशनच्या वतीने आणि जयनिल फाऊंडेशनच्या सहकार्याने आयोजन : युवा उद्योजक गौतम पाटील

अमळनेर (प्रतिनिधी) छत्रपती संभाजी राजे यांच्या जयंतीनिमित्त १४ मे रोजी अमळनेर शहरात “स्वराज्य रक्षक छत्रपती शंभू राजे महानाट्य”चे भव्य आयोजन करण्यात आले आहे. संस्कृती फाऊंडेशनच्या वतीने आणि जयनिल फाऊंडेशनच्या सहकार्याने हे महानाट्य छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृहात सादर होणार आहे.
सामाजिक जाणिवा वृद्धिंगत करण्याच्या उद्देशाने जयनिल फाऊंडेशनची स्थापना करण्यात आली असून, संस्थेच्या कार्याचा प्रारंभ या महानाट्याच्या माध्यमातून होत असल्याची माहिती युवा उद्योजक गौतम पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली. ते आमदार अनिल पाटील व माजी नगराध्यक्ष जयश्री पाटील यांचे सुपुत्र आहेत.
संस्कृती फाऊंडेशनचे नाट्यकलाकार निकेश राजपूत यांनी सांगितले की, या महानाट्यात सुमारे २५० कलाकार सहभागी असून छत्रपती संभाजी महाराजांचे शौर्य, पराक्रम आणि बलिदान यांची प्रभावी गाथा रंगमंचावर जिवंत केली जाणार आहे. सात्विक ठकार लिखित व राकेश राजपूत दिग्दर्शित या महानाट्यात उत्तर महाराष्ट्रातील तसेच अमळनेर परिसरातील १०० हून अधिक स्थानिक कलाकारांना संधी देण्यात आली आहे.
या महानाट्याचे यापूर्वी नंदुरबार, धुळे आदी ठिकाणी तीन यशस्वी प्रयोग झाले असून अमळनेरात चौथा व पाचवा प्रयोग रंगणार आहे. गेल्या १५ ते २० दिवसांपासून स्थानिक कलाकारांना विशेष प्रशिक्षण देण्यात येत असून, प्रेक्षकांना ‘लाईव्ह इतिहास’ अनुभवण्याची संधी मिळणार आहे. याशिवाय, या उपक्रमाच्या माध्यमातून जळगाव व अमळनेर येथे संस्कृती कला विद्यालय स्थापन करण्याचा मानस व्यक्त करण्यात आला आहे. या विद्यालयात स्थानिक कलाकारांना अभिनय, व्यक्तिमत्व विकास आणि स्वसंरक्षणाचे प्रशिक्षण दिले जाणार आहे. या पत्रकार परिषदेस नयना कुलकर्णी यांच्यासह संस्कृती फाऊंडेशनचे कलाकार उपस्थित होते.
तरुणाईला केले विशेष आवाहन
जयनिल फाऊंडेशनचे गौतम पाटील यांनी सांगितले की, संस्थेच्या माध्यमातून गरजू विद्यार्थ्यांना मदत, रोजगार मेळावे, क्रीडा व शैक्षणिक प्रोत्साहन, तसेच आरोग्यविषयक उपक्रम राबवले जाणार आहेत. छत्रपती संभाजी राजे हे तरुणाईचे आदर्श असल्याने महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी विशेष राखीव प्रयोग आयोजित करण्यात आला आहे. इच्छुक विद्यार्थ्यांनी कार्यालयातून पासेस घ्यावेत, असे आवाहन करण्यात आले आहे.

Leave a Reply